वॉर्नर ओक्‍साबोक्‍शी रडला

वृत्तसंस्था
Sunday, 1 April 2018

दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरॉन बॅंक्रॉफ्टने सॅंडपेपर घासून चेंडू कुरतडण्याचा प्रकार केल्याचे उघड झाले. या कटात सामील असलेल्या डेव्हिड वॉर्नरने सिडनीत शनिवारी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ओक्‍साबोक्‍शी रडत त्याने वारंवार माफी मागितली. त्याने वाचून दाखविलेले निवेदन

सर्वप्रथम इथे आल्याबद्दल तुमचे आभार. क्रिकेटपटू म्हणून या वाटचालीत प्रेरित केलेल्या चाहत्यांचा विश्‍वासघात केल्याबद्दल मी गांभीर्याने माफी मागतो. 
संघातील सहकारी आणि सपोर्ट स्टाफ, क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ची माफी मागतो. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या संस्कृतीचा फेरआढावा घेण्याच्या भूमिकेला माझा संपूर्ण पाठिंबा आहे.

या प्रकरणातील माझ्या सहभागाबद्दल दक्षिण आफ्रिकी खेळाडू, प्रशासक आणि चाहत्यांची माफी मागतो. तुमच्या भूमीत मी खेळाची बदनामी केली. 

क्रिकेटप्रेमी असलेल्या किंवा नसलेल्या सर्व ऑस्ट्रेलियन्सची माफी मागतो. क्रिकेट खेळून देशाचा लौकिक वृद्धिंगत करण्याचाच माझा सदैव हेतू असायचा हे मी प्रामाणिकपणे सांगू शकतो. हे करण्याच्या ध्यासातून मी असा निर्णय घेतला ज्याचा उलटा परिणाम झाला. आवडत्या सहकाऱ्यांच्या साथीत आता मैदानावर उतरता येणार नाही हे हृदयद्रावक आहे. 

माझ्या मनात एक आशेचा बारीक किरण आहे, ज्याद्वारे एके दिवशी देशासाठी खेळण्याचा बहुमान पुन्हा मिळू शकेल, अशी आशा वाटते; पण असे यापुढे कदापी घडणार नाही या वस्तुस्थितीला मी शरण गेलो आहे. हे कसे घडले आणि एक व्यक्ती म्हणून मी कोण आहे याचा शोध मी आगामी काळात घेणार आहे. 
मला कुटुंबीयांची, पत्नी व मुलींची माफी मागायची आहे. तुमचे प्रेम इतर कशाहीपेक्षा महत्त्वाचे आहे. तुमच्याशिवाय मी कुणीही नाही याची जाणीव आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ball tempering issue David Warner says not playing for country again