बांगलादेश महिलांना विजेतेपद भारतीय संघावर पुन्हा एकदा मात

वृत्तसंस्था
Monday, 11 June 2018

बांगलादेशाच्या महिला संघाने आणखी एकदा तुल्यबळ भारतीय संघावर मात करत आशियाई टी-20 स्पर्धेत विजेतेपद मिळविले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी भारताचा अखेरच्या चेंडूवर तीन विकेट राखून पराभव केला. 
 

क्वालालंम्पूर (मलेशिया) - बांगलादेशाच्या महिला संघाने आणखी एकदा तुल्यबळ भारतीय संघावर मात करत आशियाई टी-20 स्पर्धेत विजेतेपद मिळविले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी भारताचा अखेरच्या चेंडूवर तीन विकेट राखून पराभव केला. 

प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाला 113 धावांचीच मजल मारता आली होती. बांगलादेशासाठीदेखील आव्हानाचा पाठलाग सहज झाला नाही. त्यांना विजयासाठी अखेरच्या चेंडूची वाट पाहावी लागली. 

आव्हानाचा पाठलाग करताना आयेशा रहमान आणि शमिमा सुलताना या दोघींनी बांगलादेशाला 33 धावांची सलामी दिली होती. त्या वेळी पूनम यादव हिने लागोपाठच्या चेंडूंवर दोघींना बाद केले. पूनमच्या (4/9) फिरकी माऱ्यासमोर बांगलादेश 14 षटकांत 3 बाद 66 असे अडचणीत आले होते. मात्र, झूलनने टाकलेल्या 15व्या षटकात सामन्याचे चित्र बदलले. निगर सुलताना हिने सलग तीन चौकारांसह 16 धावा घेतल्या. अखेरच्या 4 षटकांत बांगलादेशाला 31 धावांची गरज होती. सतराव्या षटकात पूनमने निगरची विकेट मिळविली. 18व्या षटकात हरमनप्रीतने स्वतः गोलंदाजी घेतली. तिने एक विकेट मिळवली, पण तिच्या षटकात दहा धावा गेल्या. पूनमे 19वे षटक पुन्हा एकदा अचूक टाकले. अखेरच्या षटकात 9 धावांची आवश्‍यकता असताना बांगलादेशाने दोन गडी गमावले. पण, त्यांनी विजय निसटू दिला नाही. 

त्यापूर्वी, हरमनप्रीत आणि वेदा कृष्णमूर्ती यांच्यात पाचव्या विकेटसाठी झालेल्या 30 धावांच्या भागीदारीमुळे भारताचा डाव सावरला गेला. हरमनप्रीत (56) वगळता भारताच्या अन्य तिघींना दुहेरी मजल मारता आली. पण, एकीलाही 11च्या पुढे जाता आले नाही. 

संक्षिप्त धावफलक ः भारत 20 षटकांत 9 बाद 112 (हरमनप्रीत कौर 56, रुमाना अहमद 2-22, खदीजा कुब्रा 2-23) पराभूत वि. बांगलादेश 7 बाद 113 (निगर सुलताना 27, रुमाना अहमद 23, पूनम यादव 4-9) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bangladesh Beat India By 3 Wickets To Clinch Women’s Asia Cup