कसोटीचे मार्केटिंग करण्यात "बीसीसीआय' अपयशी - गंभीर

वृत्तसंस्था
Friday, 18 May 2018

कसोटी क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी ठोस प्रयत्नांची गरज आहे. कसोटीपूर्वी पांढऱ्या चेंडूचे सामने खेळविल्याने त्याचा फारसा उपयोग होईल, असे वाटत नाही. -गौतम गंभीर 

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) आयपीएल भलेही प्रचंड लोकप्रिय असेल; पण त्यांना कसोटी क्रिकेटचे योग्य मार्केटिंग करण्यात अपयश आले, अशी "गंभीर' टीका भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने केली आहे. 

गंभीरचा स्पष्टवक्तेपणा यापूर्वी अनेकदा समोर आला आहे. या वेळी त्याने थेट प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय आणि "बीसीसीआय'चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी त्यांच्या उपस्थितीतच "बीसीसीआय'ला लक्ष्य केले. तो म्हणाला, ""एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेटमध्ये "बीसीसीआय'ने जेवढे लक्ष घातले, तेवढे लक्ष त्यांनी कसोटी क्रिकेटकडे दिले नाही. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्या दरम्यान 2011 मध्ये कोलकता येथे झालेल्या कसोटी सामन्यास केवळ एक हजार दर्शक उपस्थित होते.'' 

वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण असे महाराथी खेळत असताना त्यांना बघायला केवळ हजार प्रेक्षक पाहून आपण आश्‍चर्यचकित झालो. गंभीर म्हणाला, ""याबाबत "बीसीसीआय'ने कधीच विचार केला नाही. त्यांनी एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेटकडेच अधिक लक्ष पुरवले.'' 

कसोटी क्रिकेटपूर्वी पांढऱ्या चेंडूचे एकदिवसीय आणि टी 20 सामने खेळवले जातात याचे कारणच समजत नाही, असे सांगून गंभीर म्हणाला, ""लाल चेंडूने खेळले जाणारे कसोटी क्रिकेट एकदम वेगळे आहेत. मालिकेच्या आधी तीन टी 20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळल्यामुळे तुम्ही लाल चेंडूने खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याशी कसे जुळवून घेऊ शकता.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "BCCI fails in marketing for test says gambhir