मुंबईसह १२ संघटनांकडून सूचना सादर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

नवी दिल्ली - लोढा शिफारशींच्या अंमलबजावणीसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी उद्या होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर बीसीसीआय सावध झाली आहे. संलग्न ३७ पैकी १२ राज्य संघटनांनी चार संयुक्तिक सूचना न्यायालयीन मित्र गोपाल सुब्रह्मण्यम यांच्याकडे सादर केल्याची माहिती बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी आज दिली. या १२ जणांमध्ये मुंबई क्रिकेट संघटनेचाही समावेश आहे.

नवी दिल्ली - लोढा शिफारशींच्या अंमलबजावणीसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी उद्या होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर बीसीसीआय सावध झाली आहे. संलग्न ३७ पैकी १२ राज्य संघटनांनी चार संयुक्तिक सूचना न्यायालयीन मित्र गोपाल सुब्रह्मण्यम यांच्याकडे सादर केल्याची माहिती बीसीसीआयचे हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांनी आज दिली. या १२ जणांमध्ये मुंबई क्रिकेट संघटनेचाही समावेश आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाकडे अगोदरची सुनावणी १ मे रोजी झाली होती. लोढा शिफारशींची अंमलबजावणी करण्यात कोणत्या अडचणी येत आहेत, याच्या सूचना सर्व संलग्न संघटनांनी सादर  कराव्यात, असे आदेश या खंडपीठाने काढले होते. त्यानुसार १२ संघटनांनी मिळून चार सूचना सादर केल्या आहेत. मुंबईसह आंध्र, आसाम, गोवा, झारखंड, केरळ, राजस्थान, रेल्वे, त्रिपुरा, विद्यापीठ, उत्तर प्रदेश, विदर्भ या संघटनांच्या सूचना एकच आहेत. लोढा समितीच्या शिफारशीनुसार घटना करण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकडून मात्र सूचना आली नसल्याचे समजते. यामुळे त्यांची २ मे रोजी होणारी निवडणूक लांबणीवर पडली आहे. 

एक राज्य एक मत, तीन वर्षांनंतरचा कूलिंग काळ, बीसीसीआयची घटना आणि निवडून आलेले सदस्य आणि नियुक्त सदस्य यांच्या अधिकारांची विभागणी हे ते चार मुद्दे असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक संघटनेने आपल्या सूचना तयार कराव्यात यासाठी मी सर्व संघटनांशी सातत्याने संपर्कात होतो. यापैकी १२ संघटनांनी पुढे येऊन त्यांच्या सूचना दिल्या. या सूचना लेखी स्वरूपात असाव्यात असाही आग्रह करण्यात आला होता. तसेच या सूचना न्यायालयीन मित्र सुब्रह्मण्यम यांच्याकडे सुपूर्द कराव्या असेही स्पष्ट केले होते असे चौधरी म्हणाले.

सध्या बीसीसीआयचा कारभार चालवत असलेल्या प्रशासकीय समितीने न्यायालयाकडे सादर केलेल्या सद्यःस्थितीच्या अहवालात बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सी. के. खन्ना आणि खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांना तात्काळ पदावरून दूर करावे अशी सूचना केली होती, परंतु त्याअगोदरच्या सद्यःस्थिती अहवालत अमिताभ चौधरी लोढा शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करत असल्याचे कौतुक केले होते.

सूचना सादर केलेल्या संघटना 
मुंबई, आंध्र, आसाम, गोवा, झारखंड, केरळ, राजस्थान, रेल्वे, त्रिपुरा, विद्यापीठ, उत्तर प्रदेश, विदर्भ.

Web Title: BCCI Mumbai 12 Organisation Notice Supreme court