'मनोहर' प्रस्ताव बीसीसीआयने नाकारला

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

संघनिवड लांबणीवरच 
नव्या उत्पन्न वाट्याच्या मॉडेलवरून बीसीसीआयने आपली भूमिका ठाम ठेवतानाच चॅंपियन्स करंडक स्पर्धेतून माघार घेण्याची अप्रत्यक्ष धमकीही दिली आहे आणि त्यामुळेच संघ निवडही केलेली नाही. आयसीसीने संघ जाहीर करण्याची मुदत निश्‍चित केलेली आहे; परंतु अपवादात्मक परिस्थितीत या मुदतीनंतरही संघ जाहीर करण्याची मुभाही आहे. समजा 5 मेपर्यंत आम्ही संघ जाहीर केला नाही, तर आयसीसी आमचा सहभाग नाकारणार आहे का? आमचा संघ तयार आहे. केवळ जाहीर करण्याचीच औपचारिकता आहे, असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले. 

नवी दिल्ली - आयसीसीच्या उत्पन्नातील वाट्यावरून बीसीसीआय (भारतीय क्रिकेट मंडळ) आणि आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) यांच्यात सुरू असलेला तिढा अजूनही कायम राहिला आहे. "बिग थ्री मॉडेल' बाजूला करून बीसीसीआयला आणखी 100 कोटी डॉलर देण्याचा आयसीसीने दिलेला प्रस्ताव बीसीसीआयने नाकारला आहे. 

आयसीसीची महत्त्वपूर्ण बैठक दुबईत सुरू झाली आहे. या बैठकीत आयसीसीचे कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांनी उत्पन्नाच्या वाट्याच्या विभागणीचे नवे मॉडेल तयार केले, त्याच वेळी आम्हाला 100 कोटी डॉलर देण्याचा त्यांनी प्रस्ताव दिला आणि उत्तर देण्याची अंतिम मुदतही दिली; परंतु आम्हाला हा प्रस्ताव मान्यच नाही. त्यामुळे त्यांना उत्तर देण्याचा प्रश्‍नच नाही, असे दुबईतील बैठकीसाठी उपस्थित असलेल्या बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बीसीसीआय आणि मनोहर यांच्यात आता विश्‍वासाचे नाते राहिले नसल्याचेही या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

हा प्रस्ताव मनोहर यांनी दिला आहे. ते आयसीसीचे कार्याध्यक्ष आहेत; परंतु आयसीसी ही सदस्यांची संस्था आहे, अशा परिस्थितीत कार्याध्यक्ष कोणाला किती वाटा द्यायचा, हे ठरवू शकत नाही. सर्व सदस्य मिळवून तो निर्णय घेऊ शकतात. सर्व देशांशी मिळून आम्ही नवा फॉर्म्युला तयार करत आहोत. आमचा (बीसीसीआय) वाटा किती असावा, हे मनोहर निश्‍चित करू शकत नाही, असे या पदाधिकाऱ्याचे म्हणणे आहे. 

आयसीसीकडून सर्व सदस्य देशांना मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वाट्यानुसार बीसीसीआयला 579 कोटी डॉलर मिळतात. मनोहर यांचा प्रस्ताव जर आयसीसीने मान्य केला, तर बीसीसीआयला 290 कोटी डॉलरच मिळतील. सध्या बीसीसीआयच्या प्रशासनाची सूत्रे हाती असलेल्या प्रशासकीय समितीलाही ही रक्कम मान्य होणार नाही, असे सांगण्यात येत आहे. 

या प्रशासकीय समितीतील सदस्य विक्रम लिमये हे आयसीसीच्या गतवेळच्या बैठकीस बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. त्यांनीही या नव्या प्रस्तावित फॉर्म्युलाला नकार दिला होता. क्षमतेनुसार न्याय मिळण्याची मागणी त्यांनी केली होती. 

कसा होणार बीसीसीआयचा तोटा 
आयसीसीच्या नव्या प्रस्तावाबाबत सविस्तरपणे बोलताना या पदाधिकाऱ्याने सांगितले की, समजा आम्हाला 500 रुपये आणि इतर देशांना 100 रुपये मिळत आहेत. नव्या रचनेनुसार या देशांना 175 ते 200 रुपये मिळतील, तर आमचा वाटा 300 रुपयांपर्यंतच येईल. थोडक्‍यात काय, तर इतरांचा वाटा वाढवण्यासाठी आमच्या हिश्‍श्‍यात कपात करण्याचा हा प्रयत्न आहे. 

इतरांचा वाटा आम्ही वाढवू 
आमचा वाटा कायम राहिला, तर इतर देशांच्या प्रस्तावित वाट्यामध्ये वाढ करण्याचे मॉडेल आम्ही तयार करू; परंतु त्यासाठी इतर देशांनी आमच्यावर विश्‍वास ठेवावा. उत्पन्नवाढीचे मॉडेल आम्ही तयार करू शकतो, असे या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले. 

संघनिवड लांबणीवरच 
नव्या उत्पन्न वाट्याच्या मॉडेलवरून बीसीसीआयने आपली भूमिका ठाम ठेवतानाच चॅंपियन्स करंडक स्पर्धेतून माघार घेण्याची अप्रत्यक्ष धमकीही दिली आहे आणि त्यामुळेच संघ निवडही केलेली नाही. आयसीसीने संघ जाहीर करण्याची मुदत निश्‍चित केलेली आहे; परंतु अपवादात्मक परिस्थितीत या मुदतीनंतरही संघ जाहीर करण्याची मुभाही आहे. समजा 5 मेपर्यंत आम्ही संघ जाहीर केला नाही, तर आयसीसी आमचा सहभाग नाकारणार आहे का? आमचा संघ तयार आहे. केवळ जाहीर करण्याचीच औपचारिकता आहे, असेही या पदाधिकाऱ्याने सांगितले. 

Web Title: BCCI turns down Shashank Manohar's offer of additional $100 million