'वर्ल्ड कप'च्या तयारीचे पहिले पाऊल..! 

गौरव दिवेकर
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 मालिकेसाठी भारतीय संघात फार आमूलाग्र बदल झालेले नसले, तरीही आगामी चॅम्पियन्स करंडक आणि दोन वर्षांवर आलेली विश्‍वकरंडक स्पर्धा यांच्या तयारीच्या दिशेने पहिले पाऊल उचलले गेले आहे. महेंद्रसिंह धोनीच्या राजीनाम्यामुळे चर्चेच्या झोतात आलेल्या या संघनिवडीत घेतले गेलेले युवराजसिंग, आशिष नेहरा आणि सुरेश रैना यांच्याविषयीचे निर्णय महत्त्वाचे आहेत. तसेच, नवोदित खेळाडूंवर दिलेला भरही दिसू लागला आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 मालिकेसाठी भारतीय संघात फार आमूलाग्र बदल झालेले नसले, तरीही आगामी चॅम्पियन्स करंडक आणि दोन वर्षांवर आलेली विश्‍वकरंडक स्पर्धा यांच्या तयारीच्या दिशेने पहिले पाऊल उचलले गेले आहे. महेंद्रसिंह धोनीच्या राजीनाम्यामुळे चर्चेच्या झोतात आलेल्या या संघनिवडीत घेतले गेलेले युवराजसिंग, आशिष नेहरा आणि सुरेश रैना यांच्याविषयीचे निर्णय महत्त्वाचे आहेत. तसेच, नवोदित खेळाडूंवर दिलेला भरही दिसू लागला आहे. 

संघनिवडीच्या दोन दिवस आधी महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडल्याने सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना धक्का बसला खरा; पण धोनीचा स्वभाव, त्याने आतापर्यंत घेतलेले निर्णय आणि क्रिकेटतज्ज्ञांनी मांडलेली मते पाहता, हा निर्णय अचानक घेण्यात आला नव्हता. 2019 मधील विश्‍वकरंडक स्पर्धेत कोहलीच भारतीय संघाचे नेतृत्व करणार, हे जवळपास स्पष्टच होते. विश्‍वकरंडकापूर्वीची आधीची सर्वांत महत्त्वाची स्पर्धा म्हणजे चॅम्पियन्स करंडक! त्यामुळे कोहलीला या स्पर्धेपासूनच संघाचे नेतृत्व करण्याची आणि मनासारखी संघबांधणी करण्याची संधी मिळावी, हा धोनीच्या निर्णयामागील हेतू होता, हे विविध बातम्या आणि लेखांमधून समोर येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या संघनिवडीत काय निर्णय होत आहेत, याकडे लक्ष होते. 

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठीच्या संघातील सर्वांत महत्त्वाची आणि सर्वांत जास्त चर्चा होणारी निवड म्हणजे युवराजसिंगची. युवराजसिंगला यापूर्वी गेल्या वर्षी ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत संधी मिळाली होती. त्यानंतर त्याला ट्‌वेंटी-20 संघात स्थान मिळाले नाही. 2013 च्या डिसेंबरमध्ये तो शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. खराब फॉर्म आणि त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी करणारे इतर खेळाडू उपलब्ध असल्याने युवराजला संघाबाहेरच बसावे लागले होते. आता रणजी करंडक स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करत त्याने पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळविले आहे. युवराजची निवड अनेकार्थांनी महत्त्वाची आहे. युवराज सध्या 35 वर्षांचा आहे. त्यामुळे 2019 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेत तो खेळेलच, अशी खात्री नाही. पण त्यापूर्वीच्या महत्त्वाच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी तो हुकूमाचा एक्का ठरू शकतो. ही स्पर्धा होणार आहे इंग्लंडमध्ये. इथे त्याच्यासारखा हरहुन्नरी अष्टपैलू संघात असेल, तर क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमधील कोहलीची डोकेदुखी काहीशी कमी होऊ शकेल आणि त्याला जास्त पर्याय उपलब्ध राहतील. शिवाय, फलंदाजीमध्ये युवराज फिरकी गोलंदाजांपेक्षा वेगवान गोलंदाजांवर चांगली हुकूमत राखू शकतो. त्यामुळे इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवरही तो उपयुक्त ठरू शकतो. वयोमानानुसार त्याच्या हालचालींमध्ये संथपणा आला असला, तरीही आजही तो अनेकांपेक्षा उच्च दर्जाचा क्षेत्ररक्षक आहे, हेही खरंच! 

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत फलंदाजी करतानाच रोहित शर्मा जखमी झाला. त्यामुळे अजिंक्‍य रहाणेचे एकदिवसीय संघातील स्थान कायम राहिले आहे. अर्थात, अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळविताना त्यालाही कदाचित झगडावे लागेल. कारण ट्‌वेंटी-20 मध्ये निवड समितीने तरुण खेळाडूंवर भर दिला आहे; तर एकदिवसीय संघात त्याला मनीष पांडे, केदार जाधव आणि के. एल. राहुल यांच्याशी स्पर्धा करावी लागेल. कारण, एकदिवसीय संघ असा आहे : 
विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक), के. एल. राहुल, शिखर धवन, मनीष पांडे, केदार जाधव, युवराजसिंग, अजिंक्‍य रहाणे, हार्दिक पंड्या, आर. आश्‍विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रित बुमराह, भुवनेश्‍वर कुमार, उमेश यादव. 

यात धवन सलामीला असेल. 'वन-डाऊन' कोहली, त्यानंतर धोनी-युवराज-पंड्या-आश्‍विन-जडेजा-बुमराह-उमेश-मिश्रा/भुवनेश्‍वर असा सर्वसाधारण क्रम असू शकेल. मग सलामीच्या एका जागेसाठी पांडे-केदार-राहुल-रहाणे यांच्यात चुरस असेल. 

ट्‌वेंटी-20 संघातील आणखी एक महत्त्वाची निवड म्हणजे ऋषभ पंत. 19 वर्षांचा हा गुणवान खेळाडू सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. धडाकेबाज फलंदाज आणि दर्जेदार यष्टिरक्षक असलेला पंत सध्या राहुल द्रविड यांच्या तालमीत तयार होत आहे. दीर्घकालीन भविष्याचा विचार केला, तर धोनीच्या निवृत्तीनंतर ऋषभ पंत त्याची जागा घेऊ शकतो. 

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये संमिश्र कामगिरी करणाऱ्या अमित मिश्राला एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. विराट कोहली कर्णधार असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून खेळणाऱ्या युझवेंद्र चहलला ट्‌वेंटी-20 संघात संधी मिळाली. 

आता या संघांमध्ये प्रत्यक्ष संधी कुणाला मिळणार, हे बऱ्याच अंशी सराव सामन्यातील कामगिरीवर अवलंबून असेल. दुखापतींमुळे संघाबाहेर असलेला शिखर धवन पुनरागमनाच्या तयारीत आहे. तसेच, अजिंक्‍य रहाणेही दुखापतीतून सावरला आहे. आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीमुळे नेहराही क्रिकेटपासून दूर होता. हे तिघे वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त झालेले असले, तरीही 'मॅच फिट' आहेत की नाही, याचा निर्णय या सराव सामन्यांतून होईल. तसेच, दीर्घकाळ संघातून बाहेर असलेला युवराजसिंग, अंबाती रायडू, मोहित शर्मा, आशिष नेहरा, सुरेश रैना, अशोक दिंडा, विनयकुमार यांच्यासह संजू सॅमसन, मनदीपसिंग, कुलदीप यादव, चहल, सिद्धार्थ कौल, ऋषभ पंत, ईशान किशन, शेल्डन जॅक्‍सन, शाहबाझ नदीम, परवेझ रसूल यांना सराव सामन्यात संधी मिळणार आहे. पहिल्या सराव सामन्यात खुद्द धोनीच कर्णधार असेल. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवड झालेले आणि काही काळ न खेळलेले सर्व खेळाडू धोनीच्या नेतृत्वाखालील सामन्यात खेळतील. यामुळे संघव्यवस्थापनाला त्यांच्या तयारीचा अंदाज येण्यास मदत होईल. दुसऱ्या सामन्यात अजिंक्‍य रहाणे कर्णधार असेल आणि त्याच्या संघात रैना-विनयकुमार-अशोक दिंडा वगळता सर्व तरुण खेळाडू असतील. 

आगामी विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीच्या भारताच्या मोहिमेची तयारी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासून सुरू होत आहे. 'लॉंग टर्म' खेळाडू शोधण्यासाठी पुढील काही मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाच्या असतील. यातून कोणते खेळाडू गवसतायत, हे कळेलच..!

Web Title: Begining of Team India campaign for 2019 Cricket World Cup