बेन स्टोक्‍स हा पुण्याचा आधार : स्मिथ

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही खेळपट्टीवर खेळताना संघाचा समतोल सर्वांत महत्त्वाचा असतो. फक्त आमच्याच संघाला या प्रश्‍नाचा सामना करावा लागत आहे, असे नाही. सर्वच संघांवर हे दडपण असते. प्रत्येक संघामध्ये काही गुणवान खेळाडू 'बेंच'वर बसलेले आहेत. त्यामुळे अत्यंत काळजीपूर्वक संघ निवडावा लागतो. 
- स्टीव्ह स्मिथ, रायझिंग पुणे सुपरजायंट्‌स संघाचा कर्णधार 

पुणे : 'बेन स्टोक्‍स हा पुण्याच्या संघाचा आधार आहे. तो फलंदाजीमध्ये मुक्तपणे फटकेबाजी करतो. दडपणाखालीही त्याची कामगिरी चांगली होते,' अशा शब्दांत रायझिंग पुणे सुपरजायंट्‌सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने बेन स्टोक्‍सचे कौतुक केले. गुजरात लायन्सविरुद्धच्या सामन्यामध्ये पुण्याची अवस्था बिकट असताना स्टोक्‍सने महेंद्रसिंह धोनीच्या साथीत संघाचा डाव सावरला आणि आक्रमक शतक झळकावित विजय मिळवून दिला. 

यंदाच्या 'आयपीएल'पूर्वी झालेल्या लिलावामध्ये बेन स्टोक्‍सला 14.5 कोटी रुपयांना करारबद्ध करण्यात आले होते. आतापर्यंत पुण्याच्या आठ सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये स्टोक्‍सला 'सामनावीर' पुरस्कार मिळाला आहे. गुजरात लायन्सविरुद्ध काल (सोमवार) झालेल्या लढतीमध्ये स्टोक्‍सने 63 चेंडूंत नाबाद 103 धावा केल्या. यामुळे एकवेळ तीन बाद 10 अशी दयनीय अवस्था झालेल्या पुण्याला गुजरातवर विजय मिळविणे शक्‍य झाले. 

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार स्मिथने स्टोक्‍सचे तोंडभरून कौतुक केले. 'स्टोक्‍स ज्या परिस्थितीमध्ये खेळायला आला आणि त्याने जशी कामगिरी केली, त्यावरून आम्ही समाधानी आहोत. ट्‌वेंटी-20 मध्ये अष्टपैलू खेळाडू कमालीचे महत्त्वाचे असतात. स्टोक्‍स फलंदाजी करू शकतो, उत्तम गोलंदाजीही करतो आणि चपळ क्षेत्ररक्षकही आहे. असे खेळाडू संघासाठी अमूल्य असतात. मिशेल मार्श दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्याने संघाचा समतोल साधण्यासाठी स्टोक्‍स महत्त्वाचा आहे.'' गेल्या सहापैकी पाच सामन्यांमध्ये पुण्याच्या संघाने विजय मिळविला आहे. त्यापैकी तीन विजय घरच्या मैदानावर मिळाले आहेत. 

Web Title: Ben Stokes adds perfect balance for RPS, says Steve Smith