उपाहारापूर्वी शतक ठोकणारा वॉर्नर ब्रॅडमन यांच्या पंक्तीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

सिडनी - ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने मंगळवारी पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात कारकिर्दीतले 18वे शतक साजरे केले. विशेष म्हणजे त्याने उपाहारापूर्वीच शतक ठोकले. या कामगिरीमुळे दिवसातल्या पहिल्या सत्रातच शतक ठोकणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंक्तीत वॉर्नरला स्थान मिळाले.

वॉर्नरने 78 चेंडूंत केवळ 117 मिनिटांत 17 चौकारांसह शतक साजरे केले. ब्रॅडमन यांनी 87 वर्षांपूर्वी 1930 मध्ये आपल्या 334 धावांच्या खेळीत पहिले शतक उपाहारापूर्वी करताना 105 धावा केल्या होत्या. त्यापूर्वी 1902 मध्ये ऑस्ट्रेलियाच्याच व्हिक्‍टर ट्रम्पर यांनी मॅंचेस्टर येथे 103 आणि चार्ली मॅकेंत्री यांनी लीडसवर 1926 मध्ये 112 धावांची खेळी केली होती.

ऑस्ट्रेलियन फलंदाजांखेरीज केवळ पाकिस्तानचा माजिद खान या एकमेव अन्य देशाच्या फलंदाजाने अशी कामगिरी केली आहे. त्याने 1976 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 108 धावा केल्या होत्या.

वॉर्नरने या उपलब्धीबद्दल समाधान व्यक्त केले. तो म्हणाला, 'महान क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान मिळाल्याचा आनंद वाटतो. भविष्यात असाच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संघाला चांगली सुरवात करून देण्याकडे माझा कल राहील.'' वॉर्नरची ही वेगवान शतकी खेळी ठरली. त्याने यापूर्वी सिडनी मैदानावर वेस्ट इंडीजविरुद्ध गेल्या वर्षी 82 चेंडूंत शतक ठोकले होते.

आजच्या खेळीबद्दल वॉर्नर म्हणाला, 'उपाहारापूर्वी शतक वगैरे ठोकण्याचे कुठलेही नियोजन नव्हते. फलंदाजीला साथ मिळणाऱ्या खेळपट्टीवर भक्कमपणे उभे राहायचे, इतकेच ठरवले होते. सहकारी रेनशॉ यालादेखील संयम ठेवत आपल्याला उपाहारापर्यंत खेळायचे आहे, असेच सांगितले होते.'' उपाहारानंतर वॉर्नर लगेच बाद झाला. वॉर्नरने आतापर्यंत 60 कसोटी सामन्यांत 49.11च्या सरासरीने 5,206 धावा केल्या आहेत.

Web Title: Bradman's century register Warner lunch line