भारतीय संघाला रोखण्याचे आयर्लंड संघासमोर आव्हान 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 जून 2018

आयर्लंड क्रिकेट संघाने पाकिस्तानसमोर खेळताना कौतुकास्पद लढत दिली होती. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाला विजय मिळताना नाकीनऊ आले होते. भारतीय संघालाही आयर्लंडचा संघ चांगली टक्कर देईल असे वाटत असताना पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने फारच वरचढ खेळ करून आयरिश संघाला पाण्याबाहेर नाक काढायची संधीच दिली नाही. गोलंदाज आणि फलंदाज दोघांनी मिळून आयर्लंड संघाला 76 धावांच्या पराभवाचा जोरदार ठोसा मारला. दुसऱ्या लढतीत भारतीय फलंदाजांना रोखायचे कसे आणि युजवेंद्र चहल-कुलदीप यादव जोडीला खेळायचे कसे हे मोठे आव्हान आयर्लंड संघासमोर उभे ठाकले आहे. 

डब्लिन - आयर्लंड क्रिकेट संघाने पाकिस्तानसमोर खेळताना कौतुकास्पद लढत दिली होती. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघाला विजय मिळताना नाकीनऊ आले होते. भारतीय संघालाही आयर्लंडचा संघ चांगली टक्कर देईल असे वाटत असताना पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने फारच वरचढ खेळ करून आयरिश संघाला पाण्याबाहेर नाक काढायची संधीच दिली नाही. गोलंदाज आणि फलंदाज दोघांनी मिळून आयर्लंड संघाला 76 धावांच्या पराभवाचा जोरदार ठोसा मारला. दुसऱ्या लढतीत भारतीय फलंदाजांना रोखायचे कसे आणि युजवेंद्र चहल-कुलदीप यादव जोडीला खेळायचे कसे हे मोठे आव्हान आयर्लंड संघासमोर उभे ठाकले आहे. 

मॅलाहाईड मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात सुरवातीपासून भारतीय संघाने वरचष्मा ठेवणारा खेळ केला. रोहित शर्मा आणि शिखर धवनने मनमोकळी फटकेबाजी केली आणि नंतर चहल-कुलदीप फिरकी जोडीने मिळून सात फलंदाजांची शिकार केली. 

""फिरकीला तोंड देताना चेंडू टाकायच्या आधीच पुढे सरसावण्याची कृती आयरिश फलंदाजांना महागात पडली. दुसऱ्या सामन्यात चहल-कुलदीप जोडीला आम्ही वेगळ्या तंत्राने खेळू,'' असे आयर्लंडचा कर्णधार गॅरी विल्सन म्हणाला. 

दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ के. एल. राहुलला संधी देण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. गोलंदाजीतही एक दोन बदल केले जातील, असे समजते. नऊ हजार क्षमतेच्या प्रेक्षागृहातील 80% जागा भारतीय पाठीराख्यांनी काबीज केल्या होत्या. दुसऱ्या सामन्याची सर्व तिकिटे कधीच विकली गेली असल्याने वेगळाच उत्साह शुक्रवारच्या सामन्याला दिसणार आहे. 

Web Title: Challenge for Ireland team to stop the Indian team