ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेची ठिकाणे बदलणार?

पीटीआय
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

नवी दिल्ली/ मुंबई - भारतीय क्रिकेट मंडळाच्या नाड्या आवळण्याची तयारी लोढा समितीने सुरू केली आहे. आता थेट लोढा समितीच्या शिफारशी मंजूर केलेल्याच संलग्न संघटनांच्या कार्यक्षेत्रातच आंतरराष्ट्रीय कसोटी संयोजनास मंजुरी देण्याचे ठरवले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून याची अंमलबजावणी होईल. हे प्रत्यक्षात आल्यास ऑस्ट्रेलिया मालिकेचा कार्यक्रम बदलण्यात येईल.

नवी दिल्ली/ मुंबई - भारतीय क्रिकेट मंडळाच्या नाड्या आवळण्याची तयारी लोढा समितीने सुरू केली आहे. आता थेट लोढा समितीच्या शिफारशी मंजूर केलेल्याच संलग्न संघटनांच्या कार्यक्षेत्रातच आंतरराष्ट्रीय कसोटी संयोजनास मंजुरी देण्याचे ठरवले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून याची अंमलबजावणी होईल. हे प्रत्यक्षात आल्यास ऑस्ट्रेलिया मालिकेचा कार्यक्रम बदलण्यात येईल.

प्रत्येक वेळी खर्चास मंजुरी द्या, नाही तर आंतरराष्ट्रीय मालिका रद्द होईल, अशी धमकी भारतीय क्रिकेट मंडळ देत असते. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी वेळेत रक्कम मिळाली नाही, त्यामुळे त्याचा खर्च पाहुण्या इंग्लंड मंडळास करण्याची विनंती करण्यात आली होती. आता हा प्रश्‍न कायमचा निकालात काढण्यासाठी लोढा समितीच्या शिफारशी अमलात आणण्यास मंजुरी दिलेल्या संघटनांच्या कार्यक्षेत्रातच लढतींना मंजुरी देण्याचे ठरवले आहे, असे लोढा समितीतील वरिष्ठ सदस्यांनी सांगितल्याचे वृत्त एका संकेतस्थळाने दिले आहे.

लोढा समितीने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय तसेच ट्‌वेंटी-20 मालिकेपासूनच याची अंमलबजावणी करणे टाळले आहे, असे सूत्रांनी सांगितले. लोढा समितीची अंमलबजावणी आतापर्यंत केवळ राजस्थान, विदर्भ आणि त्रिपुरा या तीनच संघटनांनी केली आहे. आम्ही संलग्न संघटनांना शिफारशी अमलात आणण्यासाठी पुरेसा वेळ दिला आहे, आता कोणतीही सूट दिली जाणार नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील कसोटी केवळ जयपूर आणि नागपूरलाच होतील; पण त्यास आमचा नाईलाज आहे, असेही सांगितल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय मंडळाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीपासून तर लढत रद्द होईल, हे सांगण्यास सुरुवात केली. प्रत्येक कसोटीसाठी निधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी करत भारतीय मंडळ आपल्याबाबत सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. हा निधी घेतानाच संघटना लोढा समितीच्या शिफारशी अमलात आणण्यास विरोध करत असल्याचे सांगत आहे. भारतीय मंडळाने मंजुरी दिल्यास संघटनांना अंमलबजावणी करावीच लागेल, असेही समितीचे मत असल्याचे सांगितले जात आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा कार्यक्रम
लढत तारीख ठिकाण संघटना
पहिली कसोटी 23 ते 27 फेब्रुवारी पुणे (महाराष्ट्र)
दुसरी कसोटी 4 ते 8 मार्च बंगळूर (कर्नाटक)
तिसरी कसोटी 16 ते 20 मार्च रांची (झारखंड)
चौथी कसोटी 25 ते 29 मार्च धरमशाला (हिमाचल प्रदेश)

Web Title: Change places Australia in the series