धोनी धमाक्‍यास पुणेकर मुकणार?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

पुणे - दोन वर्षांच्या ब्रेकनंतर पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात शुक्रवारी आयपीएलमध्ये लढत होत आहे. कावेरी प्रश्‍नामुळे चेन्नईने ‘होम ग्राउंड’ म्हणून पुण्याची निवड केली. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी फॉर्मात असला, तरी त्याची खेळी पाहण्यास पुणेकर मुकण्याची चिन्हे दिसून येत आहेत. रैनापाठोपाठ धोनीही जखमी खेळाडूच्या यादीत जाऊन बसल्यामुळे आता चेन्नईसमोर प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खेळाडूंच्या तंदुरुस्तीचे खरे आव्हान आहे. 

पुणे - दोन वर्षांच्या ब्रेकनंतर पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात शुक्रवारी आयपीएलमध्ये लढत होत आहे. कावेरी प्रश्‍नामुळे चेन्नईने ‘होम ग्राउंड’ म्हणून पुण्याची निवड केली. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी फॉर्मात असला, तरी त्याची खेळी पाहण्यास पुणेकर मुकण्याची चिन्हे दिसून येत आहेत. रैनापाठोपाठ धोनीही जखमी खेळाडूच्या यादीत जाऊन बसल्यामुळे आता चेन्नईसमोर प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खेळाडूंच्या तंदुरुस्तीचे खरे आव्हान आहे. 

आयपीएलमध्ये पुनरागमन केल्यापासून चेन्नईला तंदुरुस्तीचा प्रश्‍न भेडसावत आहे. प्रथम त्यांच्या संघातील पुणेकर केदार जाधव पहिल्या जखमी झाला. त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याला संपूर्ण मोसमास मुकावे लागले. त्यानंतर सुरेश रैनाही पायाची पोटरी दुखावल्यामुळे तिसऱ्या सामन्यात खेळू शकला नाही. तिसऱ्या सामन्यात पंजाबविरुद्ध खेळताना धोनीला पाठदुखीचा त्रास झाला. बुधवारी त्याने सराव केला नाही, पण गुरुवारी तो सरावात सहभागी झाला. त्याच्या समावेशाबद्दल सामन्यापूर्वीच निर्णय होईल, असे चेन्नईचे फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी यांनी सांगितले, मात्र स्पर्धेचा हा पहिला टप्पा असल्यामुळे चेन्नई धोका पत्करणार नसल्याचे स्पष्ट आहे. धोनी खेळू शकला नाही, तर ऑस्ट्रेलियाचा शेन वॉट्‌सन याच्याकडे नेतृत्वाची सूत्रे जाऊ शकतील. चेन्नईचा आणखी एक हुकमी खेळाडू रैना याच्या उजव्या पायाच्या पोटरीचे स्नायू दुखावले आहेत. त्याने गुरुवारी जॉगिंग तसेच थोडा सराव केला. त्याच्याबाबतही सामन्यापूर्वी ठरेल.

राजस्थानने अडखळत्या प्रारंभानंतर कामगिरी उंचावली आहे, पण टॉप गिअर टाकण्यासाठी त्यांची मदार इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्‍स याच्यावर असेल. त्याला अद्याप पैसावसूल कामगिरी करता आलेली नाही. राजस्थानचा कर्णधार अजिंक्‍य रहाणे गेल्या वर्षी पुणे संघात होता. त्यामुळे त्याच्यासाठीसुद्धा हे एका अर्थाने होम ग्राउंडच असेल. राजस्थानसंघाकडून पुण्याचा राहुल त्रिपाठी खेळणार असल्याने एका तरी पुण्याच्या खेळाडूचा खेळ पहायला मिळणार आहे. दोन्ही संघांनी आधीचे सामने गमावले आहेत. त्यामुळे जिंकण्याच्या निर्धाराने ते मैदानावर उतरतील. हा मुद्दा चुरस वाढविणारा असेल.

खेळपट्टीवर असलेली हिरवळ पाहून चेन्नईचे प्रशिक्षक हसी यांनी समाधान व्यक्त केले. भारतात असे चित्र अभावाने दिसते असे मत त्यांनी व्यक्त केले. बीसीसीआयचे क्‍युरेटर रमेश महामुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. 

चाहत्यांसाठी ‘चेन्नई एक्स्प्रेस’
चेन्नई - यंदाच्या आयपीएलमधून पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज फ्रॅंचाइजीने आपल्या पाठीराख्यांसाठी धमाल कल्पना राबवली असून, ते आपल्या चाहत्यांना मोफत पुण्याला घेऊन येणार आहेत. कावेरी पाणीप्रश्‍नावरून चेन्नईतील सर्व सामने पुण्यात हलवण्यात आले. त्या वेळी त्यांचे समर्थकही नाराज झाले होते. मात्र, फ्रॅंचाइजीने एक धमाल शक्कल लढवली आणि आपल्या चाहत्यांना पुण्याला घेऊन येण्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र रेल्वेच ‘बुक’ केली. ‘विस्लपोडू एक्‍स्प्रेस’ नावाने ही रेल्वे चेन्नईहून निघालीदेखील असून, यात सुपर किंग्ज संघाचे एक हजार समर्थक आहेत. या प्रवासासाठी या चाहत्यांना काहीच खर्च करायचा नाही. त्यांचा रेल्वे प्रवास हा पूर्णपणे मोफत असेल आणि त्यांची राहण्याची व्यवस्थादेखील फ्रॅंचाइजीने केली आहे. 

Web Title: Chennai captain Mahendra Singh Dhoni