इंग्लंडमधील अपयश प्रशासक समिती शास्त्रींशी चर्चा करणार

वृत्तसंस्था
Monday, 10 September 2018

इंग्लंड दौऱ्यात भारताला एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांची मालिका गमवावी लागली आहे. मालिकेतील चालू पाचवा सामना संपल्यावर भारतीय संघाच्या कामगिरीचे प्रशासक समितीकडून पोस्ट मार्टेम करण्यात येणार आहे. 
 

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट नियामक मंडळावरील प्रशासक समिती भारतीय संघाच्या इंग्लंडमधील अपयशाबाबत मार्गदर्शक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा करणार आहे. 

इंग्लंड दौऱ्यात भारताला एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांची मालिका गमवावी लागली आहे. मालिकेतील चालू पाचवा सामना संपल्यावर भारतीय संघाच्या कामगिरीचे प्रशासक समितीकडून पोस्ट मार्टेम करण्यात येणार आहे. 

प्रशासक समितीची एक बैठक मंगळवारी (ता. 11) मुंबईत होणार आहे. नव्या घटनेची अंमलबजावणी आणि इंग्लंड दौऱ्यातील कामगिरी हे दोन मुख्य विषय या बैठकीच्या विषय पत्रिकेवर असतील, असे "बीसीसीआय'च्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. नवी घटना लागू होऊन निवडणूक होत नाही, तोवर क्रिकेट सल्लागार समिती अपात्र ठरते. त्यामुळे आता शास्त्रींशी थेट बोलायचे की त्यांच्याकडून लेखी अहवाल घ्यायचा या विषयी निर्णय प्रशासक समितीच घेणार आहे. बैठकीत निवड समिती अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांचे मत घ्यायचे की नाही, याबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे. 

"बीसीसीआय'च्या आतापर्यंतच्या तीन दशकांहून अधिक कालखंडात प्रत्येक दौऱ्यानंतर व्यवस्थापकाचा अहवाल सादर केला जातो आणि त्यानुसार निर्णय घेतले जात होते. प्रशिक्षकाचे मत कधीच विचारात घेतले जात नव्हते. 

"बीसीसीआय'चा पदाधिकारी म्हणाला, ""खरे सांगायचे, तर व्यवस्थापकाना खेळाडूंच्या कामगिरीवर भाष्य करण्याचा अधिकारच नाही. व्यवस्थापकाने केवळ प्रशासकीय बाबींवर आपली मते मांडणे अभिप्रेत आहे. त्यामुळे क्रिकेटपटूंच्या कामगिरीचे आवलोकन हे केवळ शास्त्री, कर्णधार कोहली आणि निवड समिती अध्यक्ष यांच्या म्हणण्यावरच अवलंबून राहील. अर्थात, यात कोणाची निवड करायची, हा प्रश्‍न प्रशासक समितीचा आहे.'' 

"बीसीसीआय'च्या इतिहासात आतापर्यंत ग्रेग चॅपेल खेरीज यांच्याशिवाय कुठल्याच प्रशिक्षकाने परदेशातील कामगिरीबाबत आपला अहवाल दिलेला नाही. अध्यक्ष किंवा सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही पोस्ट मार्टेम करणारी बैठक होऊ शकते. पण, प्रत्यक्षात हंगामी अध्यक्ष सी. के. खन्ना ही जबाबदारी घेण्यास तयार नाहीत आणि हंगामी सचिव अमिताभ चौधरी यांचे अधिकार प्रशासक समितीने गोठवले आहेत. त्यामुळे आता ही बैठक कोण बोलावणार, याकडे सर्वांचा नजरा लागून आहेत. 

प्रशासक समिती खेळाडूंच्या तंदुरुस्तीविषयी फिजियो पॅट्रिक फरहात यांनादेखील जाब विचारण्याची शक्‍यता आहे. भुवनेश्‍वर, बुमरा, अश्‍विन असे अनेक खेळाडू या दौऱ्यात अनफिट ठरले आहेत. ही बाब गंभीर असल्याचे प्रशासक समितीचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: committee discuss with Shastri about Englands tour failure