स्मिथ, हॅंड्‌सकोम्बविरुद्ध बीसीसीआयची तक्रार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

नवी दिल्ली - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात "डीआरएस'वरून निर्माण झालेल्या वादात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि पीटर हॅंड्‌सकोम्ब यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) अधिकृत तक्रार दाखल केली.

दुसऱ्या कसोटीत मैदानावरील पंचानी पायचीत दिल्यावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने "डीआरएस'बाबत सल्ला घेण्यासाठी ड्रेसिंगरुमकडे पाहून इशारा केला होता. त्या वेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीने याला आक्षेप घेत पंचांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली होती. सामना भारताने जिंकल्यावर या घटनेवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या.

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत स्मिथने त्या क्षणी आपला मेंदू बधिर झाला होता. काय करायचे ते कळत नव्हते. त्यामुळे माझ्याकडून तशी कृती झाली अशी कबुली देत माफीदेखील मागितली होती. त्याचवेळी ड्रेसिंगरुममधून सल्ला घेण्यास आपल्यास सहकारी हॅड्‌सकोम्बने सुचवले असेही त्याने म्हटले होते.

या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर सामना निरीक्षक ख्रिस ब्रॉड दखल घेतील अशी अपेक्षा बाळगली जात होती. प्रत्यक्षात त्यांनी आमच्याकडे कुणाविरुद्धही तक्रार आली नसल्याने कुणावर कारवाई करण्याचा प्रश्‍नच येत नाही, असा खुलासा करत या वादाकडे जाणूनबुजून काणाडोळा केला. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी भावनेच्या ओघात दोन्ही संघांतील खेळाडूंकडून उमटलेली प्रतिक्रिया असे या घटनेबाबत सांगितले.

Web Title: complaint on smith & handscomb by bcci