कुक आणि रूटची दमदार शतके 

सुनंदन लेले 
Tuesday, 11 September 2018

लंडन : ऍलिस्टर कुक आणि ज्यो रूटने दमदार शतके झळकावीत 259 धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारताविरुद्ध पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यावरील यजमान इंग्लंडची पकड अजून मजबूत झाली. या दोघा दादा फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. चौथ्या दिवशी चहापानास इंग्लंडने 6 बाद 364 धावा केल्या होत्या. त्यांची एकूण 404 धावांची आघाडी जमली होती. 

आज मुख्य आकर्षण अर्थातच कुक होता. खेळाला सुरवात झाल्यावर खेळपट्टी अजून संथ झाली असल्याचे बघायला मिळाले. त्यातून भारताचा मुख्य गोलंदाज ईशांत शर्माच्या घोट्याला दुखापत झाल्याने तो मैदानावर आला नाही. हाती असलेल्या सर्वांना गोलंदाजी देऊनही भारतीय कर्णधार विराटला कुक-रूट जोडी फोडता आली नाही. दोघांनी अगदी सहजी फलंदाजी करत पहिले दोन तास भारताला यशापासून लांब ठेवले. उपाहाराअगोदर वीस मिनिटे कुकचे 33वे शतक झोकात पार पडले. 

रूटला दोन वेळा जीवदान लाभले. एकदा जडेजाच्या गोलंदाजीवर प्रचंड वेगाने आलेला झेल अजिंक्‍य रहाणेला पकडता आला नाही. दुसऱ्या वेळेला रूटच्या बॅटची कड चेंडूने घेतली असताना यष्टिरक्षक रिषभ पंत मध्ये आल्याने चेतेश्वर पुजाराला झेल पकडता आला नाही. रूटने त्याचा योग्य फायदा घेत उपाहारानंतर शतक पूर्ण केले. साडेतीन तास भारतीय गोलंदाज जोडी फोडायला प्रयत्न करीत होते. अखेर पदार्पण करणाऱ्या हनुमा विहारीला एकाच षटकात दोनदा यश मिळाले. प्रथम षटकार मारायच्या प्रयत्नात रूट झेलबाद झाला. पाठोपाठ कुकची मोठी खेळी संपली. हा झेल पंतने पकडला. मग भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी कुकशी हस्तांदोलन केले. त्यानंतर शमीने जॉनी बेअरस्टॉला आणि जडेजाने बटलरला लवकर बाद केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cook and Roots Superb centuries