विक्रमी विजयानंतरही मुंबई गटसाखळीतच गारद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

मुंबई - विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मुंबईने गोव्याचा आठ विकेट व 44.2 षटके राखून पराभव केला. या विक्रमी विजयानंतरही मुंबईवर साखळीतच गारद होण्याची वेळ आली. गुजरातने आघाडीवर असलेल्या बंगालला 132 चेंडू राखून हरवत मुंबईला मागे टाकत "क' गटातून आगेकूच केली.

मुंबई - विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत मुंबईने गोव्याचा आठ विकेट व 44.2 षटके राखून पराभव केला. या विक्रमी विजयानंतरही मुंबईवर साखळीतच गारद होण्याची वेळ आली. गुजरातने आघाडीवर असलेल्या बंगालला 132 चेंडू राखून हरवत मुंबईला मागे टाकत "क' गटातून आगेकूच केली.

चेन्नईत सुरू असलेल्या या स्पर्धेत सलग दोन विजयांनंतर मुंबईला दोन मोठ्या पराभवांना सामोरे जावे लागले होते. त्याची भरपाई मुंबईने गोव्याला 266 चेंडू राखून हरवून करण्याचा प्रयत्न केला खरा; पण गुजरातने यापूर्वीच बाद फेरी निश्‍चित केलेल्या बंगालविरुद्ध एकतर्फी बाजी मारली. मुंबई, तसेच गुजरातचे समान चार विजय व 16 गुण होते. निव्वळ धावगतीच्या शर्यतीत गुजरातने (+0.969) मुंबईला (+0.732) सहज मागे टाकले. या स्पर्धेच्या सलामीला मुंबईने गुजरातला हरवले होते; पण मुंबई मध्य प्रदेश व बंगालविरुद्ध पराजित झाला, तर राजस्थान व मुंबईविरुद्ध गुजरात हरला होता.

मुंबईच्या गोव्याविरुद्धच्या विजयाची सर्वच दखल घेतील. प्रथम फलंदाजी करणाऱ्या गोव्याला शार्दुल ठाकूर, धवल कुलकर्णी व अभिषेक नायर यांनी 95 धावांत गुंडाळले. रोहित शर्मा चार धावाच करू शकला; पण आदित्य तरे व सूर्यकुमार यादव यांनी 3.2 षटकांत 76 धावा तडकावत मुंबईचा विजय साकारला. मुंबईकरांनी एकंदर 11 चौकार व सात षटकारांची आतषबाजी केली.

विक्रमच विक्रम
- मुंबईची 17.47 ही धावगती प्रथम श्रेणीतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत वेगवान.
- मुंबईने 5.5 षटकांत लक्ष्य गाठले.
- रेल्वेने 2014 च्या नोव्हेंबरमध्ये राजस्थानविरुद्धचे लक्ष्य 5.3 षटकांत गाठले होते.
- नागपूरच्या त्या लढतीत राजस्थान 35, तर रेल्वे 5.3 षटकांत 1 बाद 39.

संक्षिप्त धावफलक - गोवा - 35 षटकांत 95 (अमोघ देसाई 10, सगुण कामत 23- 37 चेंडूंत 3 चौकार, किनन वाझ 17, दर्शन मिसाळ 22; धवल कुलकर्णी 9-2-17-3, शार्दुल ठाकूर 8-0-27-2, अभिषेक नायर 10-3-23-4) पराजित वि. मुंबई - 5.4 षटकांत 2 बाद 99 (श्रेयस अय्यर 14- 9 चेंडूंत 3 चौकार, सूर्यकुमार यादव नाबाद 40- 11 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार, आदित्य तरे नाबाद 38- 11 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार; सौरभ बांदेकर 3-0-52-1, फेलिक्‍स आलेमाव 2-0-31-1).

बाद फेरीतील संघ - "अ' गट - विदर्भ, बडोदा. "ब' गट - तमिळनाडू, महाराष्ट्र. "क' गट - बंगाल, गुजरात. "ड' गट - कर्नाटक, झारखंड.

Web Title: cricket competition