कसोटीत अव्वल बनण्याकडेच लक्ष : रहाणे 

वृत्तसंस्था
Wednesday, 15 November 2017

रणजीतील अपयश विसरून जा 
भारतीय संघाच्या विश्रांतीच्या कालावधी बहुतेक प्रमुख खेळाडू रणजी करंडक खेळत होते. रहाणेदेखील मुंबईकडून खेळला. मात्र, त्याला अपयश आले. तो फार धावा करू शकला नाही. रहाणे म्हणाला, ""मी 45, 49 धावा केल्या. मोठी खेळी खेळायला अपयश आले हे खरे. पण, मी खेळायला आलो तेव्हा मला किती चेंडू आणि वेळ मिळाला हे बघणेदेखील महत्त्वाचे आहे. धावांपेक्षा मी चेंडू किती खेळायला मिळाले याकडे लक्ष देतो.'' 

कोलकता : भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे याने मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचे सगळे लक्ष कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकावर येण्याकडे लागून असल्याचे सांगितले. 

भारताने याच वर्षी श्रीलंकेत कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 मालिकेत निर्भेळ यश मिळविले होते. आता भारतात तशीच मालिका होत असताना त्याच निकालाची पुनरावृत्ती होणार का? असे विचारले असता रहाणे म्हणाला, ""प्रत्येक वेळेस तसाच निकाल लागेल असे नाही. श्रीलंकेत आम्ही त्यांच्यावर निर्भेळ यश मिळविले म्हणून आम्ही त्यांना या मालिकेत दुबळे समजू असे नाही. आमच्यासाठी प्रत्येक मालिका महत्त्वाची आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांक गाठायचा हेच आमचे उद्दिष्ट आहे.'' 
या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी होणारा प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा असेल, असे सांगून रहाणे म्हणाला, ""दक्षिण आफ्रिकेत जाण्यापूर्वी खेळला जाणारा प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा असेल. श्रीलंकेविरुद्धची मालिका त्या अपवाद नाही.

मायदेशात आमच्याकडून झालेल्या पराभवानंतर श्रीलंका संघाने उभारी घेतली आहे. त्यांची तयारी चांगली आहे. पूर्ण मालिकेचा विचार करण्यापेक्षा पहिल्याच सामन्याचा विचार आम्ही करत आहोत. आमच्या ताकद आणि क्षमतेनुसार आम्ही खेळ करू.'' 
सराव सत्रात नेटमध्ये अन्य फलंदाजांप्रमाणे रहाणेदेखील स्विपचा सराव करताना दिसून आला. तो म्हणाला, ""प्रत्येक सामन्यात तुमचा खेळ सुधारण्याची गरज आहे. तुमच्याकडे फटक्‍यांची विविधता असायला हवी. त्यामुळेच मी नेटमध्ये स्विपचा सराव करत होतो. सामन्यात क्षमता दाखविण्याची वेळ आलीच, तर मी शंभर टक्के योगदान देईन यात शंकाच नाही.'' 

रणजीतील अपयश विसरून जा 
भारतीय संघाच्या विश्रांतीच्या कालावधी बहुतेक प्रमुख खेळाडू रणजी करंडक खेळत होते. रहाणेदेखील मुंबईकडून खेळला. मात्र, त्याला अपयश आले. तो फार धावा करू शकला नाही. रहाणे म्हणाला, ""मी 45, 49 धावा केल्या. मोठी खेळी खेळायला अपयश आले हे खरे. पण, मी खेळायला आलो तेव्हा मला किती चेंडू आणि वेळ मिळाला हे बघणेदेखील महत्त्वाचे आहे. धावांपेक्षा मी चेंडू किती खेळायला मिळाले याकडे लक्ष देतो.'' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news Ajinkya Rahane statement