बांगलादेशचा श्रीलंकेवर तणावपूर्ण लढतीत दोन गडी राखून विजय 

वृत्तसंस्था
Saturday, 17 March 2018

या सामन्यातील शेवटचे षटक सनसनाटी ठरले. या षटकातील अखेरचे तीन चेंडू असताना बांगलादेश आणि श्रीलंका खेळाडूंत थेट मैदानावर चकमक झडली. बांगलादेश कर्णधार शकीब, तर आपल्या खेळाडूंना माघारी बोलवत होता; पण खलिद मेहमूदने कर्णधारास शांत केले आणि लढत सुरू झाली. अखेरीस महमुदुल्लाने अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार मारत बांगलादेशला विजयी केले.

कोलंबो : महमुदल्ला याच्या आक्रमक फलंदाजीमुळे बांगलादेशने निदहास तिरंगी ट्‌वेंटी 20 स्पर्धेच्या सांगता लढतीत यजमान श्रीलंकेचा पराभव केला आणि स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अर्थात, त्यांच्या विजयाला प्रतिस्पर्धी संघांमधील खेळाडूंमध्ये ठराविक अंतराने झालेल्या बाचाबाचीचे गालबोट लागले. आता या स्पर्धेत रविवारी भारत आणि बांगलादेश यांच्यात अंतिम फेरीची लढत होईल. 

या सामन्यातील शेवटचे षटक सनसनाटी ठरले. या षटकातील अखेरचे तीन चेंडू असताना बांगलादेश आणि श्रीलंका खेळाडूंत थेट मैदानावर चकमक झडली. बांगलादेश कर्णधार शकीब, तर आपल्या खेळाडूंना माघारी बोलवत होता; पण खलिद मेहमूदने कर्णधारास शांत केले आणि लढत सुरू झाली. अखेरीस महमुदुल्लाने अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर षटकार मारत बांगलादेशला विजयी केले. सामन्यानंतरही दोन्ही खेळाडूंत बाचाबाची झाली. बांगलादेशने विजयानंतर सर्पनृत्य सुरू केल्यावर श्रीलंका खेळाडू चिडले होते. बांगलादेश प्रशिक्षक कोर्टनी वॉल्शही मैदानावर येऊन खेळाडूंना शांत राहण्यासाठी खुणावत होते. प्रकरण सुदैवाने जास्त ताणले गेले नाही. 

त्यापूर्वी प्रथम फलंदाजी करताना कुशल परेरा आणि थिसरा परेरा यांच्या अर्धशतकी खेळीने श्रीलंकेला 7 बाद 159 धावांची मजल मारता आली होती. बांगलादेशाकडून मुस्तफीझूर रहमान याने दोन गडी बाद केले. कुशल आणि थिसरा यांनी 5 बाद 41 अशा कठीण परिस्थितीतून संघाला दीडशतकी मजल मारून दिली. त्यानंतर सलामीचा फलंदाज तमिम इक्‍बालचे अर्धशतक आणि त्यानंतर मोक्‍याच्या वेळी महमुदुल्लाने 18 चेंडूंत दिलेल्या नाबाद 43 धावांच्या तडाख्यामुळे बांगलादेशाने 19.5 चेंडूत 8 बाद 160 धावा केल्या. महमुदुल्लाने षटकार ठोकून बांगलादेशाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

संक्षिप्त धावफलक - श्रीलंका ः 7 बाद 159 (कुशल परेरा 61 - 40 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकार, थिसरा पेरेरा 58 - 37 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार, मुस्तफीझूर रेहमान 4-1-39-2) 
बांगलादेश ः 19.5 षटकांत 8 बाद 160(तमिम इक्‍बाल 50 - 42 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार, मुशफीकर रहीम 28, महमुदुल्ला नाबाद 43 - 18 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकार, अकिला धनंजया 4-0-37-2)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news Bangladesh beat Sri lanka in t20 tri series