इंग्लंडला सापडला विजयाचा ‘रूट’

पीटीआय
शुक्रवार, 2 जून 2017

केनिंग्टन ओव्हल - ज्यो रूटच्या नाबाद १३३ धावांच्या जोरावर इंग्लंडने बांगलादेशचे त्रिशतकी आव्हान पार केले आणि चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. बांगालादेशकडून तमिम इक्‍बालची शतकी खेळी व्यर्थ ठरली.

केनिंग्टन ओव्हल - ज्यो रूटच्या नाबाद १३३ धावांच्या जोरावर इंग्लंडने बांगलादेशचे त्रिशतकी आव्हान पार केले आणि चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. बांगालादेशकडून तमिम इक्‍बालची शतकी खेळी व्यर्थ ठरली.

प्रथम फलंदाजी मिळाल्यानंतर बांगलादेशने सावध सुरवातीनंतर ३०५ धावा केल्या. इंग्लंडने आठ विकेट आणि १६ चेंडू राखून विजय मिळवला. ॲलेक्‍स हेल्सचे शतक मात्र पाच धावांनी हुकले; मात्र या दोघांनी १५९ धावांची भागीदारी करून इंग्लंडचा विजय अगोदरच स्पष्ट केला होता. रूटचे हे १० वे एकदिवसीय शतक आहे. फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडचा कर्णधार मॉर्गननेही वेगवान नाबाद पाऊणशतकी केले. 

दोन दिवसांपूर्वी भारताविरुद्धच्या सराव सामन्यात अवघ्या ८४ धावांत धुव्वा उडालेल्या बांगलादेशने त्रिशतकी मजल मारली. या स्पर्धेत पहिले शतक करण्याचा मान त्यांच्या तमिम इक्‍बालने मिळवला.

गतउपविजेता इंग्लंडचा संघ त्यांच्या वेगवान गोलंदाजीमुळे यंदाही ताकदवर समजला जात आहे. इंग्लंडचे गोलंदाज निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची शक्‍यता होती. प्रत्यक्षात मात्र शतकवीर तमिम इक्‍बाल आणि मुशफिकर रहिम यांनी सामन्याची अर्धी षटके इंग्लिश गोलंदाजांना विकेट मिळू दिली नाही. 

इऑन मॉर्गन नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. तमिम इक्‍बाल आणि सौम्या सरकार यांनी अर्धशतकी सलामी दिली; पण त्यांच्या धावांची सरासरी फार कमी होती. चेंडूची लकाकी कमी झाल्यावर मात्र हा वेग वाढत गेला. तमिमने इम्रुल कायससह संघाच्या ९५ धावा फलकावर लावल्या. त्या वेळी इंग्लिश गोलंदाज संधीची वाट पाहत होते. इंग्लंडने पहिल्या २० षटकांत बांगलादेशचे दोन गडी बाद केले. परंतु त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी त्यांना ४५ व्या षटकाची वाट पाहावी लागली. मॉर्गनने स्वतःसह सात गोलंदाजांचा वापर केला; पण फारसे यश आले नाही.

तमिम आणि मुशफिकूर रहिम यांनी डाव सावरला नाही; परंतु टप्प्या-टप्प्याने धावांची गतीही वाढवत नेली. तमिमने आपले पाचवे एकदिवसीय शतक पूर्ण केले. विकेटच्या शोधात २५ षटके खर्ची घातल्यावर इंग्लंडच्या गोलंदाजांचा संयम कमी होत गेला. तमिमने स्टोक्ससह इंग्लंडच्या प्रत्येक गोलंदाजावर हल्ला चढवला. तमिम आणि मुशफिकूर यांनी तिसऱ्या विकेटसाठी १६६ धावांची भागीदारी केली. तेव्हाच बांगलादेश तीनशे धावांपर्यंत मजल मारणार हे निश्‍चित झाले होते.  अखेरच्या टप्प्यात प्लंकेटने तमिम आणि मुशफिकूर यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. त्यामुळे त्यांच्या धावसंख्येवर मर्यादा आल्या. शब्बीर अहमदच्या १५ चेंडूतील २४ धावांच्या खेळीमुळे बांगलादेशचे त्रिशतक धावफलकावार लागले. 

संक्षिप्त धावफलक 
बांगलादेश ५० षटकांत ६ बाद ३०५ (तमिम इक्‍बाल १२८ -१४२ चेंडू, १२ चौकार, ३ षटकार, सौम्या सरकार २८, मुशफिकूर रहिम ७९ -७२ चेंडू, ८ चौकार, शब्बीर रहमान २४,  प्लंकेट ४-५९). पराभूत वि. इंग्लंड ः ४७.२ षटकांत २ बाद ३०८ (अलेक्‍स हेल्स ९५ -८६ चेंडू, ११ चौकार, २ षटकार, ज्यो रूट नाबाद १३३ -१२९ चेंडू, ११ चौकार, १ षटकार, मॉर्गन नाबाद ७५ -६१ चेंडू, ८ चौकार, २ षटकार, मोर्तझा १०-०-५६-१, शब्हीर रेहमान १-०-१३-१).

Web Title: cricket news bangladesh vs england champions trophy