भावनांवर नियंत्रण ठेवायचे आहे : विराट कोहली

रविवार, 18 जून 2017

सामना कोणताही असला तरी आमची तयारी त्याच एकाग्रतेने होत असते. आत्ताच्या घडीला संघ शांत आहे. मला वाटते की भावनांवर नियंत्रण ठेवले तरच मनात असेल ती गोष्ट मैदानावर करता येते. वातावरणाने भारावून जाता कामा नये; मग सगळे ठीक होते, असा माझा अनुभव आहे.

लंडन - सामना कोणता आहे...प्रतिस्पर्धी संघ कोण आहे... लोकांचे म्हणणे काय आहे...सोशल मीडियावर काय धमाल चालू आहे, या सगळ्यापासून लांब राहून या स्पर्धेत प्रत्येक सामन्याला सामोरे जाताना जे आम्ही करत आलो तेच करायचे आहे. शेवटच्या सामन्याची तयारी पूर्ण झाली आहे. आम्हाला आमच्या बलस्थानांचा विचार करून योजना आखून त्याची अंमलबजावणी रविवारी करायची आहे,'' विराट घडाघडा विचार मांडत होता.

"सामना कोणताही असला तरी आमची तयारी त्याच एकाग्रतेने होत असते. आत्ताच्या घडीला संघ शांत आहे. मला वाटते की भावनांवर नियंत्रण ठेवले तरच मनात असेल ती गोष्ट मैदानावर करता येते. वातावरणाने भारावून जाता कामा नये; मग सगळे ठीक होते, असा माझा अनुभव आहे. भारत पाकिस्तान सामना म्हटला की सगळ्यांचे कान उभे राहतात. अपेक्षा वाढतात. गेल्या सामन्यात काय झाले याची चर्चा होते. आम्ही या सगळ्यापासून लांब राहायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत. मनावर ताबा ठेवून सामन्यात उतरायचे, असा आमचा प्रयत्न असेल,'' असे त्याने सांगितले.

"हार्दिक पंड्याला गेल्या दोन सामन्यांत गोलंदाज म्हणून अपेक्षित कामगिरी करता आली नसली, तरी आमचा त्याच्या गुणवत्तेवर भरवसा आहे. तो खरा सामना जिंकून देणारा खेळाडू आहे. अंतिम सामन्याकरता संघात बदल करायचा आत्ता तरी माझ्या मनात कोणताही विचार नाहीये,'' असे त्याने स्पष्ट केले.

रोखण्यापेक्षा बाद करण्याचा विचार करू : सर्फराज
"भारतीय फलंदाजांचा सध्याचा फॉर्म बघता त्यांना रोखणे कठीण आहे. माझ्या हाती असे चांगला गोलंदाज आहेत, की भारतीय फलंदाजांना बाद करायचा विचार आम्ही करू. मधल्या षटकात जो संघ विकेट्‌स मिळवतो त्याला मुसंडी मारायची संधी आपोआप निर्माण होते,'' असे पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज म्हणाला.

"पहिल्या सामन्यातील दारुण पराभव आम्हाला सगळ्यांना जागे करून गेला. नंतर आमच्या खेळात सुधारणा झाली आहे. संधी मिळालेल्या प्रत्येक तरुण खेळाडूने नाणे खणखणीत वाजवून दाखवले आहे. आम्हाला यश मिळवायचे असेल तर आक्रमक क्रिकेट खेळावे लागेल. मला आमच्या पाठिराख्यांचे आभार मानावेसे वाटतात, की त्यांनी संघाला कठीण काळातही प्रोत्साहन दिले. रविवारच्या सामन्याला जबरदस्त वातावरण असेल, याची आम्हाला कल्पना आहे. सर्व खेळाडू अंतिम सामन्यासाठी उतावळे झाले आहेत,'' असे त्याने सांगितले.

Web Title: cricket news India, Pakistan Champions trophy final, Virat Kohli