पाकिस्तानला एक धक्का अजून द्या

सुनंदन लेले
शनिवार, 17 जून 2017

ओव्हल मैदानाची खेळपट्टी गरम हवेने आणि भरपूर रोलींगने टणक झाली आहे. वेगवान गोलंदाजांना पहिल्या अर्धातास मदत मिळेल नंतर फलंदाज बॅट तलवारी सारखी सपासप चालवतील. रविवारी पावसाच्या थोड्या व्यत्ययाचा अंदाज वर्तवण्यात आला तरी संपूर्ण सामना धुतला जाईल असे वाटत नाही.

लंडन - 4 जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना बर्मिंगहॅमला झाला तेव्हा कोणाच्या ध्यानीमनी नसेल, की 18 जूनला ओव्हल मैदानावर भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांसमोर चॅंपियन्स करंडकाच्या अंतिम लढती करता उभे ठाकतील. अशक्‍य ते शक्‍य झाले आहे. एकीकडे भारतीय संघ प्रत्येक सामन्यात सुधारीत वरचढ कामगिरी करून अंतिम फेरीत पोहोचला आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान संघ बऱ्याच अडचणींवर मात करून ओव्हल मैदानावर येऊन पोहोचला आहे. भारतीय संघ नुसता गतविजेता म्हणून नव्हे तर विराट कोहलीच्या सहकाऱ्यांचा जबरदस्त खेळ बघता सर्वांना भारतीय संघ अंतिम सामन्यात येईल असे वाटले होते. पाकिस्तान संघाने यजमान इंग्लंड संघाला उपांत्य सामन्यात पराभवाचा धक्‍का देत अंतिम सामन्याचे दार उघडले आहे. साहजिकच रविवारी दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधे होणाऱ्या लढतीला "जातिवंत क्रिकेट खुन्नस'ची किनार आहे. 

वंदा किंवा निंदा भारतात क्रिकेटला जनमान्यता आहे हे नाकारून चालणार नाही. लोकाश्रय लाभला असल्यानेच हा खेळ इतका लोकप्रिय झाला आहे. त्यातून जसा फरक "भाऊ' आणि "बायकोचा भाऊ' यात असतो तसाच फरक क्रिकेट सामना आणि भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यात असतो. गेल्या दशकात दोन देशातील संबंध पराकोटीचे ताणले गेले असताना 100 कोटी भारतीयांना, पाकिस्तानला सोडू नका...कसेही करून त्यांना हरवा, असेच वाटत असते. म्हणूनच भारत पाकिस्तान सामन्याचे महत्त्व वाढते. लोकांच्या अपेक्षांची एक प्रकारची धग या सामन्याअगोदर जाणवते. 

चार पैकी तीन सामने भारतीय संघाने फारच आरामात जिंकले. एकमेव पराभव झाला त्यावेळी श्रीलंकन फलंदाजांनी खरच अफलातून बेधडक फलंदाजी केली. भारतासमोर पाकिस्तानचा साखळी सामन्यात ज्या प्रकारे पराभव झाला ते बघता पाकिस्तान संघ पुढे मजल मारेल असे वाटले नव्हते. निर्णायक साखळी सामन्यात श्रीलंकेने हातातला सामना सोपे झेल सोडून पाकिस्तानला बहाल केला. एकमेव चांगला खेळ पाकिस्तान संघाने उपांत्य सामन्यात केला. 

अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजीच्या सुसाट सुटलेल्या रथाला पाकिस्तानी गोलंदाज रोखू शकतात का यावर सगळे रंग अवलंबून आहेत. महंमद अमीर आणि हसन अली बरोबर जुनैद खान या वेगवान त्रिकुटावर पाकिस्तानच्या मुख्य आशा आहेत. भारतीय गोलंदाजीत कोहली बदल करेल असे वाटत नाही. प्रश्‍न एकच आहे की हार्दिक पंड्याला श्रीलंका आणि बांगलादेश समोर मार पडला. पाचव्या गोलंदाजाची त्रुटी केदार जाधवने भरून काढली म्हणून अडचण टळली. अंतिम सामन्यात मुख्य पाच गोलंदाजांना कंबर कसून मारा करावा लागणार आहे. 

ओव्हल मैदानाची खेळपट्टी गरम हवेने आणि भरपूर रोलींगने टणक झाली आहे. वेगवान गोलंदाजांना पहिल्या अर्धातास मदत मिळेल नंतर फलंदाज बॅट तलवारी सारखी सपासप चालवतील. रविवारी पावसाच्या थोड्या व्यत्ययाचा अंदाज वर्तवण्यात आला तरी संपूर्ण सामना धुतला जाईल असे वाटत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) सर्व पदाधिकारी सर्व सदस्य देशांचे प्रतिनिधींबरोबर भारतातील बऱ्याच कंपन्यांचे उच्चाधिकारी लंडनला येऊन धडकले आहेत जे सगळे सामन्याला हजर राहणार आहेत.

Web Title: cricket news India, Pakistan match preview in Champions Trophy