वाँडरर्स विकेटवरून वादंग; कोहलीसेनेला विजयाची चाहूल 

Saturday, 27 January 2018

अर्धशतकापासून दोन धावांवर असताना रहाणे लेगस्टंप बाहेरचा चेंडू टोलवताना बाद झाला. तरीही तळातील फलंदाजांची शेपटी वळवळतच राहिली. महंमद शमीने आडव्या बॅटचा वापर करत 27 धावा केल्या आणि संघाची गरज ओळखून 33 धावांची बहुमुल्य खेळी भुवनेश्‍वरने केली. फिलॅंडर - मॉर्केल आणि रबाडा या तिघा वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी तीन फलंदाजांना बाद करून भारताचा डाव 240 धावांवर संपवला. 

जोहान्सबर्ग : खराब होत जाणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी जिद्द दाखवत फलंदाजी केल्याने तिसऱ्या कसोटीचा रंग बदलला आहे. 240 धावांची आघाडी घेतल्यावर भारताचा पहिला डाव 247 धावांवर संपला. अजिंक्‍य रहाणे (48 धावा) आणि भुवनेश्‍वर कुमार (33 धावा) च्या प्रयत्नांमुळे भारताला आघाडीचा आकडा 200च्या पार नेता आला. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेला विजयाकरता 241 धावा करायचे आव्हान उभे राहिले. 

जोहान्सबर्ग कसोटी सामन्याचा तिसरा दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. प्रथम मुरली विजयने ऑफ स्टंप कुठे आहे हे बरोबर जाणत चेंडू सोडण्याचे दाखवलेले तंत्र लाजवाब होते. फिलॅंडरचा उजव्या स्टंप बाहेरचा चेंडू खेळताना लोकेश राहुल बाद झाला तेव्हा दडपण भारतीय फलंदाजीवर आले. विराट कोहलीने विजय सोबत मग किल्ला लढवला. दोघांनी गोलंदाजांना यशापासून दोन तास लांब ठेवले. उपहाराअगोदरच्या शेवटच्या षटकात विजय 25 धावा करून बाद झाला. 

विश्‍वासाने भारलेली कोहलीची 41 धावांची खेळी कगिसो रबाडाने झपकन आत येणारा चेंडू टाकून संपवली. हार्दिक पंड्याला रहाणेला साथ देणे जमले नाही. एव्हाना अजिंक्‍य रहाणे फारच सुंदर फलंदाजी करू लागला होता. आखूड टप्प्याचा मारा तर त्याने व्यवस्थित खेळलाच वर पुढे पडलेल्या चेंडूंवर कडाकड ड्राईव्हज्‌चे चौकार मारले. रहाणेला भुवनेश्‍वर कुमारने झकास साथ दिली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचून आघाडीचा आकडा200च्या पार नेला. सामना बघणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावरचा तणाव थोडा कमी झालेला दिसला. 

अर्धशतकापासून दोन धावांवर असताना रहाणे लेगस्टंप बाहेरचा चेंडू टोलवताना बाद झाला. तरीही तळातील फलंदाजांची शेपटी वळवळतच राहिली. महंमद शमीने आडव्या बॅटचा वापर करत 27 धावा केल्या आणि संघाची गरज ओळखून 33 धावांची बहुमुल्य खेळी भुवनेश्‍वरने केली. फिलॅंडर - मॉर्केल आणि रबाडा या तिघा वेगवान गोलंदाजांनी प्रत्येकी तीन फलंदाजांना बाद करून भारताचा डाव 240 धावांवर संपवला. 

विजयाकरता 241 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाच्या फलंदाजांच्या मनात गोलंदाजांपेक्षा विकेटची भिती जास्त होती. मार्करमला महंमद शमीने त्याने टाकलेल्या पहिल्याच षटकात बाद केले. डीन एल्गर फलंदाजी करताना प्रत्येक चेंडू लागणार असा खेळत होता. 9व्या षटकात बुमराचा चेंडू खेळताना एल्गरचा अंदाज चुकला आणि चेंडू हेलमेटवर आदळला. अगोदरही दोन वेळा मैदानावरील पंचांनी विकेटच्या स्वभावावरून चिंता व्यक्त केली होती. एल्गरला चेंडू लागल्यावर पंचांनी सामना अधिकारी बरोबर चर्चा करून खेळ थांबवला तो एल्गरला डोक्‍यात चेंडू लागला म्हणून. 

दोनही पंच आणि सामना अधिकारी आयसीसी बरोबर चर्चा करून चौथ्या दिवशी सामना पुढे चालू ठेवायचा का रद्द करायचा याचा निर्णय घेणार आहेत. पण, सामना होईल अशी माहिती मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news India vs South Africa test match in Johansberg