दिल्ली कसोटी अनिर्णीत; भारताने जिंकली सलग नववी मालिका

Wednesday, 6 December 2017

पदार्पण करणाऱ्या रोशन सिल्वाने (नाबाद 74) यष्टीरक्षक डिकवेला (नाबाद 44) बरोबर मोठी भागीदारी रचून भारताला विजयापासून चार हात लांब ठेवले. विराट कोहलीने आळीपाळीने हातातील चार गोलंदाजांना वापरून बघितले. 103 षटके श्रीलंकन संघाने खंबीर फलंदाजी करून सामना अनिर्णीत ठेवला. 

नवी दिल्ली : अपेक्षेप्रमाणे कोटलाच्या खेळपट्टीने भारतीय गोलंदाजांची सत्त्वपरीक्षा बघितली. श्रीलंकन फलंदाजांनी केलेला कडवा प्रतिकार करून भारतीय संघाच्या विजयाच्या आशा मोडून काढल्या. धनंजय डिसिल्वाने शतक करून श्रीलंकन लढाईचा मोर्चा सांभाळला. दिवसभराच्या खेळात अथक प्रयत्न करून भारतीय गोलंदाजांना फक्त 2 श्रीलंकन फलंदाजांना बाद करता आले यावरूनच कोटला खेळपट्टीने टाकलेल्या गुगलीचा अंदाज येऊ शकतो. पाचव्या दिवशी 5 बाद 299 धावसंख्येवर सामना थांबवण्यात आला. या मालिकेसह भारताने सलग 9 मालिका जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. 

पाचव्या दिवशीचा खेळ चालू झाल्यावर अनुभवी मॅथ्यूजची विकेट त्यामानाने लवकर मिळाली. रवींद्र जडेजाने झपकन वळणारा चेंडू टाकला आणि बॅटची कड घेऊन उडालेला झेल अजिंक्‍य रहाणेने उजवीकडे झेपावत घेतला. मॅथ्यूज बाद झाल्यानंतर धनंजय डिसिल्वाने कर्णधार दिनेश चंडिमलच्या साथीने तंत्रशुद्ध फलंदाजी केली. धनंजय मोठे फटके मारतानाही कचरत नव्हता. कोटलाच्या खेळपट्टीवरून चेंडू टप्पा पडल्यावर पटकन जात नसल्याने फलंदाज क्रीजमध्ये मागे सरकून खेळत राहिले. उपहाराला धनंजय डिसिल्वा आणि चंडिमल नाबाद राहिल्याने श्रीलंकेची सामना अनिर्णीत राखायची आशा जिवंत होती. 

पाचव्या दिवशी कोटला मैदानाची खेळपट्टी गोलंदाजांना साथ देईल हा अंदाज साफ कोलमडून पडला. उपहारानंतर अश्‍विनने 33 षटकांची भागीदारी तोडली. हवेत चांगला उंची दिलेला चेंडू बघून चंडिमल पुढे सरसावला. टप्पा पाडून चेंडू वळल्याने अंदाज चुकून चंडिमल अश्‍विनला बोल्ड झाला. धनंजय डिसिल्वाने त्याच्यातील गुणवत्तेची चुणूक दाखवत शतक पूर्ण केले तेव्हा श्रीलंकन खेळाडूंसह भारतीय खेळाडूंनीही टाळ्या वाजवून दाद दिली. शतकानंतर धनंजयला पायात गोळे यायला लागले. शेवटी 119 धावांवर वेदना असह्य झाल्याने धनंजय डिसिल्वा आत गेला. 

पदार्पण करणाऱ्या रोशन सिल्वाने (नाबाद 74) यष्टीरक्षक डिकवेला (नाबाद 44) बरोबर मोठी भागीदारी रचून भारताला विजयापासून चार हात लांब ठेवले. विराट कोहलीने आळीपाळीने हातातील चार गोलंदाजांना वापरून बघितले. 103 षटके श्रीलंकन संघाने खंबीर फलंदाजी करून सामना अनिर्णीत ठेवला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news India vs Sri Lanka The third cricket Test between India and Sri Lanka ends in a draw; India win series 1-0