भारताचा द. आफ्रिकेत ऐतिहासिक मालिका विजय 

Wednesday, 14 February 2018

भारताने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या 115 धावांच्या खेळीच्या जोरावर 7 बाद 274 धावा केल्या. विजयासाठी 275 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरवात सावध होती. पण हार्दिक पंड्याने सुरवातीला दिलेल्या दोन दणक्‍यानंतर कुलदीपच्या फिरकीने दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडाली. एकवेळ विजयाची आशा बाळगलेल्या दक्षिण आफ्रिकेचा डाव 201 धावांत संपुष्टात आला. रोहित शर्मा सामन्याचा मानकरी ठरला.

पोर्ट एलिझाबेथ : रोहित शर्माने केलेली शतकी खेळी आणि त्यानंतर भारतीय फिरकीने उडवलेली यजमानांची दाणादाण याच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. भारताने मंगळवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 73 धावांनी पराभव केला. रोहितच्या शतकी खेळीनंतर कुलदीपने चार गडी बाद करत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी केली. 

भारताने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या 115 धावांच्या खेळीच्या जोरावर 7 बाद 274 धावा केल्या. विजयासाठी 275 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरवात सावध होती. पण हार्दिक पंड्याने सुरवातीला दिलेल्या दोन दणक्‍यानंतर कुलदीपच्या फिरकीने दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडाली. एकवेळ विजयाची आशा बाळगलेल्या दक्षिण आफ्रिकेचा डाव 201 धावांत संपुष्टात आला. रोहित शर्मा सामन्याचा मानकरी ठरला. 

विजयाकरिता 275 धावांचा पाठलाग करणे सोपे नक्कीच नव्हते. नव्या चेंडूवर मोठे फटके मारणे शक्‍य आहे हे लक्षात घेऊन कर्णधार मार्करमने सुरवातीला ऑन द राईज ड्राइव्हज्‌ मारले. मार्करमचा खूप जोरात मारलेला झेल श्रेय अय्यरने सोडला. आकर्षक 34 धावा करून त्रासदायक ठरू बघणाऱ्या मार्करमला बुमराने बाद केले. बुमराने ब्रेक थ्रू मिळवून दिल्यावर हार्दिक पंड्याने फलंदाजीतले अपयश पुसून काढले. पंड्याने ड्युमिनी आणि एबी डिव्हिलर्सला पाठोपाठ बाद केले. चौथ्या विकेटकरिता मिलरने आमलाला चांगली साथ दिली. मिलरच्या फलंदाजीत गेल्या सामन्यातला आत्मविश्‍वास डोकावत होता. ही जोडी भारताची डोकेदुखी ठरेल असे वाटत असताना चहलने मिलरचा त्रिफळा उडवला. दक्षिण आफ्रिकेच्या डावाला हशीम आमला सुंदर फलंदाजी करून एकटा हाकत होता. धोकादायक आमलाला हार्दिकने स्टंपवर सरळ चेंडू फेकून धावबाद केले तो क्षण निर्णायक ठरला. 

आमला बाद झाल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानातील हवाच निघून गेली होती. चौथ्या सामन्यात सहजी षटकार ठोकणाऱ्या फेहलुकवायोला कुलदीप यादवने गुगली टाकून चकवले. चेंडू आपल्याला चकवून स्टंपवर आदळलाच कसा याचे आश्‍चर्य वाटत फेहलुकवायो तंबूत परतला. आता सगळी मदार वॉंडरर्सचा सामनावीर क्‍लासेनवर होती. क्‍लासेनने कुलदीपला एकाच षटकात दोन लांबच्या लांब षटकार मारून युद्ध संपले नसल्याची साक्ष दिली. पण, वाढलेली आवश्‍यक धावगती आणि फिरकीचे दडपण त्यांच्या उर्वरित खेळाडूंना पेलवले नाही. कुलदीप यादवने एकाच षटकात रबाडा आणि मोठे फटके मारणाऱ्या क्‍लासेनला बाद केले. चहलने मॉर्केलला पायचित करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news INDvsSA India historic Series Win in South Africa Beat South Africa By 73 Runs