'कोहलीने पाकिस्तानमध्ये शतक करून दाखवावेच'

वृत्तसंस्था
Wednesday, 7 February 2018

विराट आमच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानमध्ये शतक करूच शकत नाही. आमचा संघ चांगला आहे. मात्र, कोहलीची फलंदाजी पाहताना आनंद वाटतो. तो एक दर्जेदार खेळाडू आहे.

कराची : रन मशीन नावाने प्रसिद्ध असलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला पाकिस्तानचे प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी खुले आव्हान दिले असून, आर्थर यांनी कोहलीने पाकिस्तानविरुद्ध पाकिस्तानमध्ये शतक करून दाखवावे असे म्हटले आहे.

कोहलीने नुकतेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यात एकदिवसीय कारकिर्दीतील 33 शतक झळकाविले होते. 29 वर्षीय कोहलीने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्ध त्यांच्या मायदेशात शतक झळकाविलेले नाही. मात्र, त्याने त्रयस्थ ठिकाणी खेळताना पाकिस्तानविरुद्ध दोन शतके केलेली आहेत. त्याला 183 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. याच मुद्द्यावरून प्रशिक्षक मिकी आर्थर यांनी त्याला आव्हान दिले आहे.

आर्थर म्हणाले, की विराट आमच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानमध्ये शतक करूच शकत नाही. आमचा संघ चांगला आहे. मात्र, कोहलीची फलंदाजी पाहताना आनंद वाटतो. तो एक दर्जेदार खेळाडू आहे.

पाकिस्तानविरुद्ध कोहली (एकदिवसीय क्रिकेटमध्ये)
१२ सामने
४५९ धावा
४५.९० सरासरी
९३.२९ स्ट्राईक रेट
१८३ सर्वोच्च धावसंख्या
२ शतके
१ अर्धशतक
२ सामनावीर पुरस्कार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news Mickey Arthur Pakistan Cricket Coach Throws A Challenge Virat Kohli