esakal | माझ्या आणि खेळाडूंच्या बक्षीस रकमेत अंतर का?: द्रविड
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Dravid

द्रविड म्हणाले... 
- विश्‍वकरंडकाच्या अंतिम लढतीत खेळण्याचा अनुभव महत्त्वाचा 
- आमच्या काळापेक्षा सध्या युवा पिढीला अधिक सामने खेळायला मिळतात 
- अधिक खेळल्याने त्यांची प्रगल्भता वाढली, तंदुरुस्तीचे महत्त्व पटले 
- कोणाविरुद्ध खेळतो याचा विचार न करता, प्रत्येक सामना कसा खेळायचा याचा विचार केला 
- खेळाडूंशी समन्वय साधताना त्यांच्या बरोबरीने सोशल मीडियाचा उपयोग केला 

माझ्या आणि खेळाडूंच्या बक्षीस रकमेत अंतर का?: द्रविड

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई - मला आणि खेळाडूंना देण्यात आलेल्या बक्षीस रकमेमध्ये अंतर का असा प्रश्न भारताच्या एकोणीस वर्षांखालील क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी उपस्थित केला. द्रविड यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) हा प्रश्न करत सर्वांनाच समान रक्कम द्यावी अशी मागणी केली आहे.

बीसीसीआयने भारतीय संघाला विश्वविजेतेपद मिळाल्यानंतर राहुल द्रविडला 50 लाख, खेळाडूंना 30 लाख आणि संघ व्यवस्थापनाला 20 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. 19 वर्षांखालील विश्‍वविजेतेपद हा तयारी आणि प्लॅनिंगचा भाग होता, कोणाविरुद्ध जिंकलो यापेक्षा कसा खेळ केला हे महत्त्वाचे होते. आता सर्व खेळाडू या विजेतेपदाचा आनंद घेत आहेत; पण मोठे लक्ष्य गाठण्यासाठी त्यांच्या खडतर प्रवासाला सुरवात होत असल्याचे मत राहुल द्रविड यांनी व्यक्त केले. 

न्यूझीलंडमध्ये 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत अजिंक्‍य ठरलेला भारतीय संघ आज मुंबईत दाखल झाला. मुंबई विमानतळावर जोरदार स्वागताचा आनंद घेतल्यानंतर सर्व खेळाडू पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. राहुल द्रविड यांनी आपल्या या शिष्यांच्या पाठीवर शाबाकीची थाप मारताना भविष्याचीही जाणीव करून दिली. तुम्हाला पुढे जाऊन मुख्य संघात खेळायचे आहे आणि त्यासाठी कसे ध्येय बाळगायचे याविषयीच्या सूचना द्रविड यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केल्या. 
अंतिम सामन्यासाठी तयारी करताना आम्ही 2012 च्या अंतिम सामन्याची क्षणचित्रे पाहिली. त्या वेळच्या ऑस्ट्रेलिया संघातील 4 ते 6 खेळाडूंचा मुख्य संघासाठी विचार केला जात आहे, आपला संघ विजेता ठरूनही केवळ एखाद्‌ दोन प्रगती करत आहे, अशी आठवण सांगणाऱ्या द्रविड यांनी या उदाहरणातून पृथ्वी शॉच्या संघाला वास्तवतेची जाणीव करून दिली. प्रत्येकाला मुख्य संघात लगेच खेळण्याची संधी मिळणार नाही; परंतु देशांतर्गत आणि प्रथम श्रेणी सामन्यात तरी हे खेळाडू आपली गुणवत्ता दाखवू शकतात आणि त्यासाठी त्यांना कठोर मेहनत आत्तापासूनच घ्यावी लागेल, असे द्रविड यांनी सांगितले. 

खडतर प्रवासाचे फळ : शॉ 
19 वर्षांखालील विजेता कर्णधार होण्यासाठी मला खडतर प्रवास करावा लागला. विरारला रहात असल्यामुळे सरावासाठी येण्याकरिता दोन- तीन तासांचा रेल्वे प्रवास. यामध्ये वडिलांची मेहनत फार मोठी आहे. सराव असो की सामने माझ्याबरोबर तेही प्रवास करायचे. आता राहुलसह संघातील इतर सपोर्ट स्टाफकडून मिळालेले मार्गदर्शन आणि अनुभव पुढे जाऊन माझ्यासाठी मोलाचा ठरणार आहे, असे पृथ्वीने सांगितले. शालेय क्रिकेट भरपूर खेळलो; परंतु देशासाठी खेळणे हा सन्मान मानतो, असेही तो म्हणाला. 

द्रविड म्हणाले... 
- विश्‍वकरंडकाच्या अंतिम लढतीत खेळण्याचा अनुभव महत्त्वाचा 
- आमच्या काळापेक्षा सध्या युवा पिढीला अधिक सामने खेळायला मिळतात 
- अधिक खेळल्याने त्यांची प्रगल्भता वाढली, तंदुरुस्तीचे महत्त्व पटले 
- कोणाविरुद्ध खेळतो याचा विचार न करता, प्रत्येक सामना कसा खेळायचा याचा विचार केला 
- खेळाडूंशी समन्वय साधताना त्यांच्या बरोबरीने सोशल मीडियाचा उपयोग केला 

loading image