द्रविडच्या मागणीमुळे सर्वांना मिळणार समान पैसे

वृत्तसंस्था
Monday, 26 February 2018

मला आणि खेळाडूंना देण्यात आलेल्या बक्षीस रकमेमध्ये अंतर का असा प्रश्न भारताच्या एकोणीस वर्षांखालील क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याने उपस्थित केला होता.

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाने 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत विजय मिळविल्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड याने सर्वांना समान बक्षीस रक्कम वाटून देण्याची केलेली मागणी बीसीसीआयकडून मान्य करण्यात आली आहे. आता प्रशिक्षक, खेळाडू व संघ व्यवस्थापनाला समान रक्कम देण्यात येणार आहे.

मला आणि खेळाडूंना देण्यात आलेल्या बक्षीस रकमेमध्ये अंतर का असा प्रश्न भारताच्या एकोणीस वर्षांखालील क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड याने उपस्थित केला होता. द्रविडने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) हा प्रश्न करत सर्वांनाच समान रक्कम द्यावी अशी मागणी केली होती.

बीसीसीआयने भारतीय संघाला विश्वविजेतेपद मिळाल्यानंतर राहुल द्रविडला 50 लाख, खेळाडूंना 30 लाख आणि संघ व्यवस्थापनाला 20 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

आता द्रविडची ही मागणी मान्य करत बीसीसीआयने प्रत्येकाला 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. संघाला प्राधान्य देणाऱ्या द्रविडने स्वतःचे नुकसान करून सर्वांना समान बक्षीस देण्याची मागणी केल्याने त्याचे कौतुक करण्यात येत होते. आता ही मागणी मान्य झाली आहे. याबरोबरच विश्वकरंडकावेळी निधन झालेले व्यवस्थापनातील सदस्य राजेश सावंत यांच्या कुटुंबीयांनीही योग्य ती रक्कम देण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news Rahul Dravids Demand for Equal Pay for India U19 Support Staff Met