आफ्रिदी भारतीय फॅनला म्हणाला, तिरंगा सरळ करा

वृत्तसंस्था
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

दुसरा सामना जिंकल्यानंतर आफ्रिदी आपल्या चाहत्यांसोबत फोटो काढत असताना एका भारतीय चाहतीच्या हातातील तिरंगा पाहून आफ्रिदी म्हणाला, की झेंडा सरळ करा. त्यानंतर त्याने तिच्यासोबत छायाचित्र काढले.

सेंट मॉरित्झ : स्वित्झर्लंडमधील सेंट मॉरित्झ येथे झालेली आईस क्रिकेट स्पर्धा जिंकल्यानंतर पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी एका भारतीय चाहतीला झेंडा सरळ करण्याच्या सूचना देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

शाहीद आफ्रिदी आणि वीरेंद्र सेहवाग कर्णधार असलेल्या या आईस क्रिकेट स्पर्धेतील दोन्ही सामने आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील संघाने जिंकले. दुसऱ्या सामन्यात सेहवागच्या संघाने 20 षटकांत 200 धावा करूनही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेत जगभरातील अनेक माजी क्रिकेटपटू सहभागी झाले होते. पहिल्यांदाच बर्फाच्या मैदानावर क्रिकेट सामने खेळविण्यात आले.

दुसरा सामना जिंकल्यानंतर आफ्रिदी आपल्या चाहत्यांसोबत फोटो काढत असताना एका भारतीय चाहतीच्या हातातील तिरंगा पाहून आफ्रिदी म्हणाला, की झेंडा सरळ करा. त्यानंतर त्याने तिच्यासोबत छायाचित्र काढले. आफ्रिदीने यावेळी अनेक चाहत्यांसोबत सेल्फीही काढले. आफ्रिदीच्या या वागण्यामुळे त्याच्यावर सोशल मिडीयामध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Web Title: cricket news shahid afridi respect for indian flag in ice cricket