esakal | चहलची धुलाई करत आफ्रिका विजयी
sakal

बोलून बातमी शोधा

cricket

चहलची धुलाई करत आफ्रिका विजयी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

सेंच्युरीयन - दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भारताचे तगडे आव्हान यशस्वीरीत्या पार करीत सहा विकेट राखून विजय मिळविला. कर्णधार जेपी ड्यूमिनी व हेन्रीक क्‍लासेन यांनी धुलाई केली. यात सर्वाधिक तडाखा युजवेंद्र चहल याला बसला. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री १२.३५ वाजता सामना संपला.

आफ्रिकेने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. निर्णायक तिसरा सामना येत्या शनिवारी होईल.

आफ्रिकेने १८९ धावांचे आव्हान तब्बल आठ चेंडू राखून पार केले. क्‍लासेनला बाद करून आशा उंचावलेल्या जयदेव उनडकटला ड्यूमिनीने लागोपाठ दोन षटकार ठोकले.

आफ्रिकेने चहलचे कोडे पूर्णपणे सोडविले. त्याच्या चार षटकांत तब्बल १६ धावांच्या सरासरीने ६४ धावांची धुलाई झाली. यात दोन चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता.

भारताकडून मनीष पांडे-धोनी यांनी ५६ चेंडूंमध्ये ९८ धावांचा पाऊस पाडला. शेवटच्या षटकात डेन पॅटरसनच्या पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेत पांडेने धोनीला स्ट्राईक दिली. त्यानंतर धोनीने ६-४-४-२-१ अशा १७ धावा वसूल केल्या. शेवटून दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेत त्याने अर्धशतक पूर्ण केले. भारताची सुरवात खराब झाली होती. 

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार जेपी ड्यूमिनी याने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली. पावसाच्या शक्‍यतेमुळे त्याने आव्हानाचा पाठलाग करण्यास पसंती दिली. दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर नवोदित वेगवान गोलंदाज ज्युनियर डॅला याने रोहित शर्माला शून्यावर पायचीत केले. धवनची फटकेबाजी ड्यूमिनीने ऑफब्रेकवर रोखली. पुढच्याच षटकात डॅलाने जेमतेम खाते उघडलेल्या विराटला (१) बाद केले. सुरेश रैनाला पुन्हा एकदा संधीचा फायदा उठविता आला नाही. जम बसल्यानंतर तो फेहलुक्वायोच्या चेंडूवर पायचीत झाला. त्या वेळी ११व्या षटकात भारताच्या ९० धावा झाल्या होत्या. 

संक्षिप्त धावफलक -
भारत - २० षटकांत ४ बाद १८८ (शिखर धवन २४-१४ चेंडू, ३ चौकार, २ षटकार, सुरेश रैना ३१-२४ चेंडू, ५ चौकार, मनिष पांडे नाबाद ७९-४८ चेंडू, ६ चौकार, ३ षटकार, महेंद्रसिंह धोनी नाबाद ५२-२८ चेंडू, ४ चौकार, ३ षटकार, ज्युनियर डॅला ४-१-२८-२, जेपी ड्यूमिनी २-०-१३-१, अँडीले फेहलुक्वायो २-०-१५-१) पराभूत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - १८.४ षटकांत ४ बाद १८९ (रिझा हेंड्रीक्‍स २६, जेपी ड्यूमिनी नाबाद ६४-४० चेंडू, ४ चौकार, ३ षटकार, हेन्रीक क्‍लासेन ६९-३० चेंडू, ३ चौकार, ७ षटकार, फरहान बेहर्डीन नाबाद १०, भुवनेश्वर ३-०-१९-०, शार्दुल ठाकूर ४-०-३१-१, उनडकट ३.४-०-४२-२, पंड्या ४-०-३१-१)

loading image