'नो बॉल'ने केला घात; दक्षिण आफ्रिकेने जिंकला सामना

Sunday, 11 February 2018

दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी चालू झाल्यावर मार्करम आणि आमलाने विश्‍वासाने सुरुवात केली. दोघांनी मागे रेलत काही सुरेख फटके मारले. भागीदारी रंगू लागली असताना मार्करमला वेगाने आत येणाऱ्या चेंडूवर पायचित करून बुमराने पहिला धक्का दिला

जोहान्सबर्ग : एका नो बॉलने भारतीय संघाच्या हातून चँम्पीयन्स ट्रॉफी निसटली होती. वॉंडरर्स मैदानावर युजवेंद्र चहलने डेव्हिड मिलरला 6 धावांवर बोल्ड केले तो नो बॉल होता. त्यानंतर मिलरने 4 चौकार 2 षटकार मारून 39 धावा केल्या. यष्टीरक्षक क्‍लासेनने नाबाद 43 धावा करून विजयाला गवसणी घातली. दोघांनी मिळून केलेल्या वेगवान 72 धावांच्या भागीदारीने सामन्याचा चेहरा बदलला.

त्या अगोदर शिखर धवनचे शतक आणि त्याला विराट कोहलीने 75 धावा करून दिलेल्या साथीच्या जोरावर भारतीय संघाने 50 षटकात 288 धावा उभारल्या होत्या. पावसाने हजेरी लावली आणि पावणे दोन तासांचा खेळ वाया गेला. नव्या गणितात दक्षिण आफ्रिकेला विजयाकरता 28 षटकात 202 धावा विजयाकरता करायच्या होत्या. दक्षिण आफ्रिकेने 26व्या षटकात 5 फलंदाजांच्या मोबदल्यात 202 धावसंख्येला गवसणी घालून मालिकेतील पहिला विजय नोंदवला. 

दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी चालू झाल्यावर मार्करम आणि आमलाने विश्‍वासाने सुरुवात केली. दोघांनी मागे रेलत काही सुरेख फटके मारले. भागीदारी रंगू लागली असताना मार्करमला वेगाने आत येणाऱ्या चेंडूवर पायचित करून बुमराने पहिला धक्का दिला. त्यावेळी 43 धावा फलकावर लागल्या होत्या. त्याच क्षणी पाऊस आला. पावणे दोन तासांचा खेळ पावसाच्या हजेरीने वाया गेल्यावर स्थानिक वेळ 8.30वाजता पंचांनी खेळ चालू केला. सामना 28 षटकांचा करून 202 धावा करायचे नवे आव्हान पक्के करण्यात आले. म्हणजेच दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकायला उरलेल्या 124 चेंडूत 159 धावा करायला लागणार होत्या. 

आमला आणि ड्युमिनी पाठोपाठ बाद झाल्यावर डिव्हीलीयर्सने चहलला दोन षटकार मारत प्रेक्षकांना आशा दाखवली. पण पुढच्याच षटकात हार्दिक पंड्याला षटकार मारायच्या प्रयत्नात डिव्हिलीयर्स बाद झाला आणि यजमान संघाच्या विजयाच्या आशा पुसट झाल्या. त्यानंतर नाट्य घडले. चहलच्या एकाच षटकात डेव्हिड मिलर चांगलाच नशीबवान होता. एकदा त्याचा झेल श्रेयस अय्यरने सोडला नंतर तो बोल्ड झाला तो नो बॉल ठरला आणि फ्री हिटवरही त्याचा झेल पकडला गेला. त्यानंतर मिलरने बॅट तलवारी सारखी चालवली. क्‍लासेनसह 72 धावांची वेगवान भागीदारी नोंदवताना दोघा फलंदाजांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारे फटके मारले. चहलने मिलरला पायचित केले. मग क्‍लासेनने शांतपणे खेळून नाबाद 43 धावा करत 26व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा विजय हाती घेतला. फुलक्वायोने तीन लांब षटकार मारून विजयी धावा काढल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news South Africa beat India by five wickets in 4th ODI