'नॉकआऊट' स्थितीत आम्ही उत्कृष्ट खेळतो : मिचेल स्टार्क

पीटीआय
बुधवार, 7 जून 2017

चॅंपियन्स करंडक स्पर्धेत अद्याप अनेक सामने बाकी आहेत, मात्र आतापर्यंत दोन्ही सामन्यांमध्ये विरोधी संघाच्या सर्व फलंदाजांना बाद करणारा ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ ठरला आहे. गोलंदाज हीच कामगिरी पुढेही चालू ठेवतील असा विश्‍वास कर्णधार स्टिव्ह स्मिथला आहे.

लंडन : ''चॅंपियन्स'मध्ये आमच्या संघाने या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. आणि अशी 'नॉकआऊट'ची स्थिती असल्यास आमचे खेळाडू सर्वोत्कृष्ट कामगिरी करतात, असं माझं मत आहे. सगळे खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या लढतीसाठी उत्सुक आहेत,' असे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने म्हटले आहे.

मिचेल स्टार्कने सोमवारी (ता. 5) बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चार गडी बाद करत आपले जोरदार पुनरागमन केले. स्टार्क सध्या त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. मात्र, पावसामुळे सामना रद्द झाल्याबद्दल त्याने खंत व्यक्त केली. परंतु, आता पूर्ण लक्ष इंग्लंडविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीवर असल्याचे त्याने स्पष्ट केले. भारताच्या दौऱ्यावर असताना मिचेल स्टार्कच्या पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर काही महिने स्टार्क संघाबाहेर होता. त्याने दुखापतीनंतर पुनरागमन करत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात चार चेंडूंमध्ये तीन गडी बाद करण्याची नेत्रदिपक कामगिरी केली.

ऑस्ट्रेलियाचे दोन्ही सामने पावसामुळे रद्द झाल्याने ते 'अ' गटात दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. इंग्लंडचा संघ याआधीच उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. दरम्यान, दुसरा कोणता संघ उपांत्य फेरीत पोचणार याबाबत उत्सुकता आहे. शुक्रवारी बांगलादेश आणि न्युझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यात कोणता संघ जिंकतो त्यावर ऑस्ट्रेलियाचेही भवितव्य ठरू शकते. त्यामुळे या तिन्ही संघांमध्ये उपांत्य फेरीत जाण्यासाठी चुरस असेल. ऑस्ट्रेलिया जर इंग्लंडविरुद्ध पराभूत झाली तर त्यांना मायदेशात परतण्याशिवाय पर्याय नाही.

न्युझीलंडविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी खराब कामगिरी केली होती. 'ही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची आजपर्यंतच्या सर्वांत खराब कामगिरींपैकी एक होती. आमच्या गोलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा होण्याची गरज आहे,' असे सांगत कर्णधार स्टिव्ह स्मिथने कांगारूंना घरचा आहेर दिला होता. त्यावर स्टार्क, हेजलवूड आणि कमिन्स यांनी बांगलादेशविरुद्ध भेदक मारा करत स्मिथच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला.

'बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सर्व गोलंदाजांचे बरोबरीचे योगदान होते. आमच्या सर्व गोलंदाजांची कामगिरी चांगली झाल्याने त्यावर बोलणे योग्य ठरेल. न्युझीलंडविरुद्धच्या लढतीनंतर गोलंदाजांना 'कमबॅक' करताना पाहून आनंद वाटतो. दुखापतीनंतर संघात परत खेळताना एक वेगळा उत्साह जाणवतो, या दोन्ही सामन्यांमुळे पुन्हा लय गवसल्यासारखे वाटते. इंग्लंडविरुद्धचा महत्त्वाचा सामना लक्षात घेता गोलंदाजीत होणारी संघाची कामगिरी सकारात्मक वाटते,' असे मत मिचेल स्टार्कने व्यक्त केले.

बांगलादेशने चॅंपियन्स करंडक स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 305 धावा करत फलंदाजीत जोरदार प्रदर्शन केले होते. मात्र ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी जास्त वेगाने गोलंदाजी केल्याने तमीम इक्‍बाल व्यतिरिक्त सर्व फलंदाजांनी शरणागती पत्करली.

स्टार्क म्हणाला, 'जर तुमचं नियोजन अचूक नसेल तर कामगिरी खराब होते. जसं आमचं मागच्या आठवड्यात झालं. परंतु, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर ड्रेसिंग रुममधील वातावरण सकारात्मक झाले आहे. आम्ही फलंदाजांना लवकर बाद करून धावगतीला आळा घालू शकतो. नव्या चेंडूवर हेजलवूडसोबत चांगली साथ जमल्याचेही यावेळी त्याने नमूद केले.

मी माझ्या याजनेत फारसा बदल करत नाही. मी नेहमी आक्रमक असतो व माझ्या साथीला हेजलवूड असल्याने मला गोलंदाजी करणे सोपे जाते. आम्ही आता फक्त इंग्लंडला कसे हरवता येईल याचा विचार करत आहोत. आम्ही मागील काही काळात त्यांच्याविरुद्ध बरेच क्रिकेट खेळलो असल्याने आम्हाला त्यांच्या खेळाडूंबद्दल बरीच माहिती आहे, असेही स्टार्कने सांगितले.

Web Title: cricket news sports news champions trophy australia mitchell starc