वरचढ भारताला हरविण्याची पाकला खुमखुमी

रविवार, 4 जून 2017

संयोजकांनी खास सामन्याकरिता बरोबर मधली खेळपट्टी भरपूर रोलिंग करून तयार केलेली आहे. क्रिकेट रसिकांना 50-50 षटकांचा संपूर्ण सामना बघायची आस लागली आहे. रविवारी हवामानाचा अंदाज पावसाच्या सरींचा आहे. त्यामुळे उत्साही प्रेक्षकांना बर्मिंगहॅमची हवा कशी साथ देते हेच बघायचे आहे.

बर्मिंगहॅम : अंतिम सामन्यापेक्षा ज्या लढतीची क्रिकेट रसिकांना प्रतीक्षा असते ती भारत विरुद्ध पाकिस्तान लढत रविवारी एजबास्टन मैदानावर होत आहे. आयसीसीने भरविलेल्या बऱ्याच सामन्यांत भारताने पाकवर मात केली आहे. कागदावर भारतीय संघ वरचढ असला तरी नव्या दमाच्या पाक संघाला त्यांना खडे चारायची खुमखुमी आहे. त्यातून भारतीय कर्णधार-प्रशिक्षक मतभेद असल्याचे चव्हाट्यावर आल्याने पसरलेल्या अस्थिरतेचा फायदा मैदानावर घेण्याचा पाक संघाचा प्रयत्न आहे.

दुसरीकडे कोहली-कुंबळे मतभेद मागे ठेवून कामावर लक्ष देत आहेत. पाकिस्तानला पराभूत करणे जनसामान्यांच्या भावनांचा विचार करता किती महत्त्वाचे आहे हे दोघे जाणतात.

गेले ते दिवस जेव्हा पाक संघात इम्रान खान, जावेद मियॉंदाद किंवा इंझमाम उल हक, वसीम अक्रम होते. या पाक संघात शोएब मलिक, वहाब रियाझ आणि महंमद हफीजकडे चांगला अनुभव आहे. कर्णधार सर्फराज अहमद याच तीन अनुभवी खेळाडूंना हाताशी धरून तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहे. भारतासमोर चांगला खेळ केल्यावर रातोरात खेळाडू हिरो कसा होतो हे सगळे जाणून आहेत.

कुंबळे-कोहली वाद अगदी नको त्या वेळी बाहेर आला. ज्याने भारतीय खेळाडूंच्यात काहीशी अस्थिरता आहे हे नाकारून चालणार नाही. परंतु, त्याचा परिणाम खेळावर होणार नाही इतके भारतीय खेळाडू अनुभवी आणि जबाबदार नक्कीच आहेत. कागदावर वरचष्मा भारताचा असला तरी कोणीही पाक संघाला दुय्यम लेखण्याची चूक करणार नाही. उलट ताज्या दमाच्या काही पाकिस्तानी खेळाडूंना भारतीय संघासमोर मोठ्या सामन्यांत खेळायचे दडपण माहीत नाही, तसेच पाक संघाकडून कोणाच्या मोठ्या अपेक्षा नसल्याने बेधडक खेळ केला जायची शक्‍यता नाकारता येत नाही.

भारतीय संघात महंमद शमी परतेल असे समजते आणि जसप्रीत बूमराहची जागा पक्की आहे. अश्‍विन आणि जडेजाच्या फिरकीला हार्दिक पांड्याची साथ असेल. फलंदाजीत अजिंक्‍य रहाणेला संघात जागा मिळणे कठीण वाटते. केदार जाधवने मागील मालिकेत जबरदस्त खेळ केला आहे. तसेच कोहलीचा विश्‍वास युवराजसिंगवर असल्याने मधल्या फळीत तेच दोघे असतील असे वाटते. पावसाची शक्‍यता वाढली तर अश्‍विनच्या जागी अजून एक वेगवान गोलंदाज खेळवायचा मोह कोहलीला पडू शकतो.

पावसाचे सावट
संयोजकांनी खास सामन्याकरिता बरोबर मधली खेळपट्टी भरपूर रोलिंग करून तयार केलेली आहे. क्रिकेट रसिकांना 50-50 षटकांचा संपूर्ण सामना बघायची आस लागली आहे. रविवारी हवामानाचा अंदाज पावसाच्या सरींचा आहे. त्यामुळे उत्साही प्रेक्षकांना बर्मिंगहॅमची हवा कशी साथ देते हेच बघायचे आहे.

Web Title: Cricket news sports news India versus Pakistan Virat Kohli MS Dhoni