भारतीय क्रिकेट संघाचा पुढील प्रशिक्षक कोण? 

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 मे 2017

गेल्या वर्षी 23 जून रोजी कुंबळे यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्या. या विजयांमुळे भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी दाखल झाला.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज (गुरुवार) दिली. इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅंपियन्स करंडक स्पर्धेनंतर अनिल कुंबळे यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. 

नव्या प्रशिक्षकपदाच्या निवड प्रक्रियेमध्ये कुंबळे यांनाही स्थान मिळणार आहे. पण कुंबळे यांना थेट मुदतवाढ मिळणार नसल्याचे 'बीसीसीआय'ने स्पष्ट केले आहे. खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीला कुंबळे यांनी सक्रिय पाठिंबा दिल्याने 'बीसीसीआय'मधील काही पदाधिकारी त्यांच्यावर नाराज असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. 

इंग्लंडमध्ये 1 ते 18 जून या कालावधीत चँपियन्स करंडक स्पर्धा होत आहे. 2013 मध्ये झालेल्या या स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विजेतेपद पटकाविले होते. आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ विजेतेपद राखण्यास सज्ज आहे. मुख्य प्रशिक्षकांची निवड करण्यासाठी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या माजी क्रिकेटपटूंची समिती नियुक्त करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली प्रशासकांची समिती या निवड प्रक्रियेवर देखरेख करणार आहे. 

गेल्या वर्षी 23 जून रोजी कुंबळे यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया या संघांविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्या. या विजयांमुळे भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी दाखल झाला. चॅंपियन्स करंडक स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ जुलैमध्ये वेस्ट इंडीजमध्ये एकदिवसीय आणि ट्‌वेंटी-20 मालिका खेळणार आहे.

Web Title: Cricket News Sports News Indian Cricket BCCI Team India Coach Anil Kumble