कसोटीचा सामनावीर रवींद्र जडेजावर एका सामन्याची बंदी

सुनंदन लेेले
Sunday, 6 August 2017

कोलंबो कसोटी दरम्यान जडेजाने गोलंदाजी करताना निराशेने चेंडू फलंदाज करुणारत्नेच्या दिशेने फेकला ज्यावर पंच ऑक्‍सेनफोर्ड आणि रॉड टकर यांनी आक्षेप घेतला.

कोलंबो : कसोटीचा सामनावीर रवींद्र जडेजावर एका सामन्याची बंदी घातली गेली असून जडेजा कँडीच्या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे नक्की झाले आहे.

चालू क्रिकेट मोसमात जडेजाने इंदोर कसोटी सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना खेळपट्टीवर पळून ती खराब करण्याच्या आरोपाबद्दल 3 नकारात्मक गुण गमावले होते. कोलंबो कसोटी दरम्यान जडेजाने गोलंदाजी करताना निराशेने चेंडू फलंदाज करुणारत्नेच्या दिशेने फेकला ज्यावर पंच ऑक्‍सेनफोर्ड आणि रॉड टकर यांनी आक्षेप घेतला.

सामनावीराचे बक्षीस स्वीकारल्यावर लगेचच जडेजाला सामना अधिकाऱ्यांनी बोलावले. जडेजाने चूक मान्य केली ज्यावर सामना अधिकाऱ्यांनी त्याला आयसीसी नियम 2.2.8 नुसार अजून 3नकारात्मक गुणांची शिक्षा ठोठावली. एका मोसमात खेळाडूने 4 गुणांपेक्षा जास्त नकारात्मक गुण गमावले तर त्याला एका सामन्याची बंदी घालण्यात येते.

रवींद्र जडेजाला भारतीय संघाच्या यशात सिंहाचा वाटा उचलल्यावर मोठी शिक्षा दिली गेल्याने भारतीय संघाच्या आनंदावर विरजण पडले. जाणून बुजून जडेजाने चेंडू फेकला हा आरोप बऱ्याच जाणकारांना जरा अतिशयोक्तिपूर्ण वाटला. परंतु नियमावर बोट ठेवत सामना अधिकाऱ्यांनी जडेजाला शिक्षा ठोठावली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news sports news ravindra jadeja banned