विलक्षण गतिमान थरारपट!

सतीश स. कुलकर्णी
रविवार, 23 जुलै 2017

धावफलक आणि आकडेवारी नेहमीच गाढव असत नाही. हरमनप्रीतच्या खेळीचं महत्त्व आकड्यांनीच अधिक ठळकपणे जाणवेल. अठ्ठावीस वर्षांच्या या खेळाडूचं हे तिसरं शतक. अगदी मोक्‍याच्या क्षणी. सामना जिंकून देणारं शतक ठरल्याचं समाधान देणारं.

ठरावीक काळानं विजयाचं पारडं इकडून तिकडे झुकावं... आनंदाच्या लाटेवर तरंगत असलेल्यांच्या पोटात भीतीनं गोळा यावा... डोळ्यांसमोर दिसणारा आणि हातात घ्यायचाच बाकी राहिलेला विजय डोळ्यांदेखत निसटतो की काय, असंही वाटावं... दडपण, भीती, ईर्षा, आनंद, उत्साह, जल्लोष... विविध भावनांचं दर्शन घडविणारा सात-साडेसात चाललेला एक थरारपट, विलक्षण गतिमान!

महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना असा उत्कंठावर्धक ठरला. झटपट क्रिकेटमध्ये दिसणारी आणि प्रेक्षकांना मनापासून पाहायला आवडणारी चौकार-षट्‌कारांची आतषबाजी इथं दिसली. पण त्याहून दिसली ती जबरदस्त स्पर्धा, जिंकण्याची आणि लढल्याविना पराभव न पत्करण्याची मनोवृत्ती. कोणत्याही खेळाचा आत्मा असलेली जिगरबाज वृत्ती.

याच लढतीत आपल्या महिला क्रिकेट संघानं "अपेक्षाभंग" केला! सलग दुसऱ्या सामन्यात...
बलाढ्य इंग्लंडविरुद्ध दणदणीत विजय नोंदवून भारतीय महिलांनी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जोरदार सलामी दिली. मग पाकिस्तानविरुद्धच्या आश्वासक विजयासह पहिले चारही सामने सहज जिंकले. अगदी सहज.एकदम भरात असलेला संघ नंतरच्या दोन सामन्यांमध्ये मात्र पार ढेपाळला. आधी दक्षिण आफ्रिका आणि मग कांगारू यांच्याविरुद्ध मिताली राजच्या सहकाऱ्यांनी नांगी टाकली. आपण उपांत्य फेरीत पोहोचतो की नाही, अशी शंका वाटू लागली. कारण "मात करू किंवा परत फिरू" या धर्तीवरचा साखळीतला शेवटचा सामना खडूस कांगारूंच्या सख्ख्या शेजारी न्यूझीलंडविरुद्ध होता. आधीच्या दोन सामन्यांमध्ये झालेला आपल्या संघाचा खेळ पाहता, हाच सामना बऱ्यापैकी अवघड वाटत होता. पहिल्यांदा अपेक्षाभंग तिथं झाला!

मिताली राजच्या शतकामुळं आपण अडीचशेच्या पार गेलो. नंतर विजापूरच्या राजेश्वरी गायकवाडची फिरकी जादूई ठरली. त्यामुळं किवी संघाला शंभरीही गाठता आली नाही. रडतखडत नव्हे, तर अगदी दिमाखात आपण उपांत्य फेरी गाठली. आता मुकाबला ऑस्ट्रेलियाशी. खरंच अवघड वाटत होतं. एका वृत्तपत्रात आज शीर्षक होतं - "ऑस्ट्रेलियाचा अडथळा". एरवी ते नकारार्थी वाटलं असतं. पण इतिहास ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं होता. विश्वचषकाचा इतिहासही त्यांचीच गौरवगाथा गात होता.

सामन्याची सुरुवातही डळमळीत झाली. अपेक्षाभंगाची अपेक्षा जागी करणारी. पहिल्या दोन सामन्यांमध्ये मस्त खेळणारी स्मृती मानधना सलग सहाव्या सामन्यात स्वस्तात बाद झाली. स्पर्धेत एक शतक झळकावणाऱ्या पूनम राऊतलाही फार काही करता आलं नाही. मिताली आणि हरमनप्रीतकौर यांची जोडी जमली होती. पण निम्मा डाव संपला, तेव्हा आपल्या खात्यात फक्त 77 धावा होत्या. मिताली 29 आणि हरमनप्रीत 24. दिलासा एवढाच होता की, अजून एखादा बळी गेला नाही. हे चित्र फार दिलासा देणारं नव्हतं नक्कीच. साखळी सामन्यात दिसलेली कांगारूंची बलाढ्य फलंदाजी पोटात गोळा आणत होती. पण उत्तरार्धात सगळंच चित्र बदललं हरमनप्रीतकौरनं. शेवटच्या 21 षट्‌कांना तिनं खास पंजाबी तडका दिला. तिच्या टोलेबाजीनंच या 21 षट्‌कांमध्ये आपण 204 धावा तडकावल्या. त्यात तिचा वाटा 73 चेंडूंमध्ये 147 धावांचा. म्हणजे चेंडूमागे दोन धावा. स्ट्राईक रेटच्या भाषेत 200! ख्रिस गेलची आठवण करून देणारी स्फोटक खेळी - 20 चौकारांनी आणि सात षट्‌कारांनी बहरलेली.

धावफलक आणि आकडेवारी नेहमीच गाढव असत नाही. हरमनप्रीतच्या खेळीचं महत्त्व आकड्यांनीच अधिक ठळकपणे जाणवेल. अठ्ठावीस वर्षांच्या या खेळाडूचं हे तिसरं शतक. अगदी मोक्‍याच्या क्षणी. सामना जिंकून देणारं शतक ठरल्याचं समाधान देणारं. शतकाच्या आनंदाला विजयाची झालर लावणारी खेळी. भारताचा डाव 252 चेंडूंचा आणि त्यात 281 धावा. ही गती षट्‌कामागे 6.69 एवढी. हरमनप्रीतकौरच्या 171 धावा फक्त 115 चेंडूंमध्ये. तिचा स्ट्राईक रेट 148. षट्‌काच्या सरासरीत बोलायचं तर 8.89. भारतीय डावातील एकूण चेंडूंच्या 46 टक्के चेंडू तिनं खेळून काढले. आणि तिच्या धावा मात्र 61 टक्के!

आव्हानात्मक धावसंख्या उभी राहिली होती. आता कसं बरं वाटत होतं. तरीही कांगारूंची फलंदाजी धडकी भरवणारी आहे, हे विसरता येत नव्हतंच. हे लक्ष्य त्यांना तेवढं अवघड वाटणार नाही, अशी धाकधूकही होतीच.

ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवातच सनसनाटी. सहा वेळा विजेत्या असलेल्या संघाची दयनीय अवस्था - आठव्याच षट्‌कात 21 धावा आणि तीन गडी परतलेले. सामना खिशात येणार, अशी आशा निर्माण झाली असताना ऑस्ट्रेलियाच्या जिगरीचं पुन्हा दर्शन झालं. पेरी आणि एलिस व्हिलानी यांची जोडी जमली. त्यांची भागीदारी 121 धावांची. भारताच्या बाजूला झुकलेलं पारडं दोलायमान झालं. मागच्या सामन्याची आठवण जागी झाली. अशा अवघड वेळी मदतीला धावून आली राजेश्वरीची फिरकी. तिनं व्हिलानीचा अडथळा दूर केला. त्यानंतर जेमतेम 14 धावांची भर पडल्यावर शिखा पांडेनं पेरीला परत पाठवलं.

सामन्याचा रंग पुन्हा बदलला. आता पारडं पुन्हा एकदा भारताच्या बाजूनं झुकलेलं. बघता बघता ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. अवघ्या 29 धावांच्या मोबदल्यात आणखी चार फलंदाज तंबूत परतले. ऑस्ट्रेलिया 32.3 षट्‌कांमध्ये 9 बाद 169. भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब होणंच बाकी होतं. एका जोडीचा अडथळा होता फक्त. ऑस्ट्रेलियाच्या विजयाची शक्‍यता दुरान्वयानेही वाटत नव्हती. त्यांना 63 चेंडूंमध्ये 113 धावा करायच्या होत्या. म्हणजे चेंडूमागे पावणेदोन धावा. टी-20 सामन्यांतही काही षट्‌कांमध्येच कधी तरी दिसणारी गती आणि शेवटची जोडी मैदानात.

सहाव्या क्रमांकावर आलेल्या अलेक्‍झांड्रा ब्लॅकवेलच्या मनात मात्र वेगळंच काही तरी होतं. "विलक्षण चित्तथरारक अनिश्‍चिततेचा खेळ" ही क्रिकेटची व्याख्या तिला सिद्ध करायची होती. त्यासाठी हीच वेळ योग्य आहे, असं तिनं ठरवलं असावं. चौतिशीजवळ आलेल्या अलेक्‍झांड्रा ऊर्फ ऍलेक्‍सानं तिच्याच वयाच्या आणि अकराव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या क्रिस्टन बीम्स हिला साथीला घेतलं. विश्वचषकाची अंतिम फेरी गाठण्याचं भारतीयांच स्वप्न उधळून लावण्याचा बेत तिनं आखला. आणि तिथनं पुढं सुरू झालं एक विलक्षण द्वंद्व. कोट्यवधींना मोहात पाडणारं चेंडू-फळीचं युद्ध.

बचावात्मक खेळून पराभव लांबविण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ब्लॅकवेलनं दुसरा मार्ग निवडला. हल्ला बोल करण्याचा! एक दिवसाचे 140 सामने खेळलेल्या आणि जेमतेम 64-65 स्ट्राईक रेट असलेल्या या खेळाडूला स्वतःला सिद्ध करण्याची अशी संधी पुन्हा लाभणार नव्हती. तिची बॅट कडाडू लागली. चौकार-षट्‌कार वाढू लागले आणि त्याच बरोबर फुगू लागला ऑस्ट्रेलियाची धावसंख्या. विजय-पराभवातलं अंतर पाहता पाहता कमी होऊ लागलं. शेवटच्या जोडीनं 49 चेंडूंमध्ये 76 धावा कुटल्या. नववा गडी बाद झाला तेव्हा ब्लॅकवेलच्या खात्यावर 28 चेंडूंमध्ये 25 धावा होत्या. नंतर तिनं तेवढेच चेंडू खेळून 65 धावा तडकावल्या.

ब्लॅकवेलचा झंझावात पाहून कर्णधार मिताली राज हतबल झाली असावी तो काही काळ. धकधक वाढविणारी, हृदयाला धडधड करायला लावणारी परिस्थिती. तिनं वेगवेगळे पर्याय वापरून पाहिले. ब्लॅकवेल आणि तिला खंबीर साथ देणारी बीम्स, दोघी कुणालाच दाद देत नव्हत्या. दोन षट्‌कं आणि 37 धावा. आव्हान अवघड होतं, पण ब्लॅकवेल ज्या पद्धतीनं खेळत होती, ते पाहता अगदी अशक्‍यही नव्हतं. मितालीनं चेंडू दीप्ती शर्माकडे दिला. एकेचाळिसाव्या षट्‌कातल्या पहिल्याच चेंडूवर तिनं ब्लॅकवेलची डावी यष्टी वाकविली. एका लढवय्या खेळीला पूर्णविराम देत भारतीय विजयावर शिक्कामोर्तब केलं.

अव्वल आणि विश्वविजेतेपदाच्या शर्यतीत अग्रस्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारतीय संघानं अंतिम फेरी गाठली आहे. लॉर्ड्‌सच्या मैदानावर पाव शतकापूर्वी कपिलच्या संघानं क्रिकेटविश्वाला चकित केलं होतं. त्याच मैदानावर आता 23 जुलैला ती जबाबदारी आहे मिताली, हरमनप्रीतकौर, दीप्ती, पूनम, स्मृती, झूलन, राजेश्वरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news sports news women cricket world cup india vs australia