श्रीलंकेचा भारतावर विजय; धवनची खेळी व्यर्थ 

वृत्तसंस्था
Wednesday, 7 March 2018

भारतीय संघ 2 बाद 9 अशा संकटात सापडला असताना शिखर धवनने मात्र निराश केले नाही. धावफलकाची गती केविलवाणी होऊ न देता डाव सावरला. मनीष पांडेला सुरवातीला जम बसवणे कठीण जात होते; परंतु त्याने रोहित आणि रैनाप्रमाणे विकेट बहाल केली नाही. जम बसल्यानंतर धवन आणि पांडे यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरवात केली. बघता बघता त्यांनी 10.4 षटकांत 95 धावांची भागीदारी केली. 

कोलंबो : भारताच्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फायदा घेत श्रीलंकेने गेल्या काही सामन्यांतील अपयशाची कसर भरून काढली आणि निद्‌हास करंडक ट्‌वेन्टी-20 स्पर्धेत सलामीला भारताचा पाच विकेटने पराभव करत विजयी सलामी दिली. शिखर धवनची शानदार 90 धावांची खेळी व्यर्थ ठरली; तर श्रीलंकेच्या कुशल परेराचा 37 चेंडूंतील 66 धावांचा तडाखा सामन्याचे चित्र पालटणारा ठरला. 

एक तर मुख्य खेळाडूंची विश्रांती त्यात रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांचे अपयश अशा परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला शिखर धवनने सहारा दिला, त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 171 धावा रचल्या. हे आव्हान श्रीलंकेने 18.3 षटकांत पार केले. 

खरे तर श्रीलंकेने तिसऱ्याच षटकांत सामन्याचा निकाल स्पष्ट केला होता. शार्दुल ठाकूरच्या या पहिल्याच षटकांत कुशल परेराने पाच चौकार आणि एका षटकारासह 27 धावा चोपून काढल्या, यामध्ये एक चेंडू नो बॉल होता. श्रीलंकेची तिसऱ्या षटकांत 1 बाद 46 अशी सुरवात करून टॉप गीअर टाकला. त्यानंतर त्यांनी सर्वच गोलंदाजांवर हल्ला चढवला. डावाच्या मध्यावर चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी विकेट मिळवल्यामुळे भारताच्या आशा जिवंत झाल्या होत्या; परंतु थिसारा परेराने निर्णायक हल्ला चढवत विजयावर शिक्कामोर्तब केले. 

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी मिळालेल्या भारताची सुरवात फारच निराशाजनक होती. कर्णधार आणि संघाचा प्रमुख फलंदाज असलेला रोहित शर्मा पहिल्याच षटकात उंच फटका मारताना बाद झाला, तेव्हा संघाचे खाते जेमतेम उघडले होते. रोहित बाद झाल्यानंतर अनुभवी सुरेश रैनावर जबाबदारी होती; परंतु तो तिन्ही यष्ट्या उघड्या ठेवून बाद झाला. 

भारतीय संघ 2 बाद 9 अशा संकटात सापडला असताना शिखर धवनने मात्र निराश केले नाही. धावफलकाची गती केविलवाणी होऊ न देता डाव सावरला. मनीष पांडेला सुरवातीला जम बसवणे कठीण जात होते; परंतु त्याने रोहित आणि रैनाप्रमाणे विकेट बहाल केली नाही. जम बसल्यानंतर धवन आणि पांडे यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरवात केली. बघता बघता त्यांनी 10.4 षटकांत 95 धावांची भागीदारी केली. 

पांडे चेंडूमागे धाव या गतीने 37 धावा करून बाद झाल्यावर रिषभ पंतला बढती देण्यात आली; परंतु नवखा असल्यामुळे त्याला प्रयत्न करूनही मोठे फटके मारता येत नव्हते. अखेर त्याचाही स्ट्राइक रेट चेंडूमागे धाव या गतीनेच होता. धवनकडून शतकाची अपेक्षा केली जात असताना तो 90 धावांवर माघारी फिरला. 

आयपीएलमध्ये कोलकाता संघाचे नेतृत्व मिळालेल्या दिनेश कार्तिकला अखेरचे काहीच चेंडू खेळण्यास मिळाले; परंतु सहा चेंडूंत 2 चौकारांसह नाबाद 13 धावा केल्यामुळे भारताला 174 धावांपर्यंत मजल मारता आली. 

संक्षिप्त धावफलक ः भारत ः 20 षटकांत 5 बाद 174 (रोहित शर्मा 0, शिखर धवन 90- 49 चेंडू, 6 चौकार, 6 षटकार, सुरेश रैना 1, मनीष पांडे 37 -35 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार रिषभ पंत 23- 23 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, दिनेश कार्तिक नाबाद 13- 6 चेंडू, 2 चौकार, चामिरा 2-33, गुणतालिका 1-16) पराभूत वि. श्रीलंका ः 18.3 षटकांत 5 बाद 175 (कुशल परेरा 66- 37 चेंडू, 6 चौकार, 4 षटकार, थिसारा परेरा नाबाद 22- 10 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, वॉशिंग्टन सुंदर 2-28, चहल 2-37).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news Sri Lanka beat India in t20 tri series