विराट-शास्त्री जोडीला पहिल्यांदा बसला चटका

Saturday, 20 January 2018

दोन कसोटी सामन्यातील सलग दोन मोठ्या पराभवांनंतर भारतीय संघ चारही बाजूंनी टीकेचा भडिमार झाल्यावर जरा जागेवर आलाय आणि सत्य परिस्थितीची जाणीव थोडी व्हायला लागलीय. दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर एका आठवड्याची विश्रांती असली तरी संघ अराम करू शकत नाहीये इतकी अस्वस्थता आली आहे.

जोहान्सबर्ग : विराट कोहली कर्णधार आणि रवी शास्त्री प्रशिक्षक असे समीकरण एकदम नवीन नाही. भारतातच नव्हे तर २०१४च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारतीय संघाचे कर्ते धर्ते होते. मायदेशात धपाधप मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली लढत दिली होती. ती मालिका आपण ०-२ फरकाने हरलो तरी कोहली - शास्त्री कॉलर ताठ करून फिरत होते. 'लर्निंग कर्व' म्हणजेच संघाचा शिकण्याचा काळ असे सांगत पराभवाकडे कानाडोळा करत होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या अडिलेड कसोटी सामन्यात कोहलीने करण शर्माला संघात जागा देताना अश्विनला बाहेर बसवले. ऑस्ट्रेलियन संघात डावखुरा वेगवान गोलंदाज होता ज्याच्या बुटांच्या खिळ्याने खेळपट्टीवरील ज्या जागची माती उकरते ती जागा ऑफ स्पिनर करता एकदम मस्त असते. हे सगळे असून कोहलीने स्वतःचे खरे करत करण शर्माला संघात घेतले ज्याचे मोठे परिणाम भोगावे लागले. रवी शास्त्री त्या निर्णयबद्दल कोहलीला काही बोलला नाही त्याने काही विरोध करताना सल्ला दिला नाही.

मधल्या काळात अनिल कुंबळे भारतीय संघाचा प्रशिक्षक झाला. कुंबळे होयबा नव्हता. काही वेळा अनुभवाचा वापर करताना कुंबळेने संघात कोणाला जागा द्यायला पाहिजे हे सुचवले होते. २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत गदारोळ झाला कि कुंबळे आणि कोहलीचे कार्यपध्दतीवरून पटत नाही. कालांतराने कुंबळेला बाहेर पडावे लागले आणि रवी शास्त्री प्रशिक्षक म्हणून परतला. काम हाती घेतल्यावर सलग मायदेशातील मालिका कोहली-शास्त्रीची जोडी जिंकत गेली. भारताबाहेर पॉल ठेऊन सर्वोत्तम संघासमोर दोन हात करताना भारतीय संघाचा पाय अडखळला आणि आता टिकेचा चटका कोहली-शास्त्रीला सहन करावा लागतोय.

दोन कसोटी सामन्यातील सलग दोन मोठ्या पराभवांनंतर भारतीय संघ चारही बाजूंनी टीकेचा भडिमार झाल्यावर जरा जागेवर आलाय आणि सत्य परिस्थितीची जाणीव थोडी व्हायला लागलीय. दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर एका आठवड्याची विश्रांती असली तरी संघ अराम करू शकत नाहीये इतकी अस्वस्थता आली आहे. काही खेळाडू जोहान्सबर्गच्या लायन पार्कला जाऊन आले काही आसपास फिरून आले पण खरे मन कोणाचे रमत नाही. अजून दोन दिवस संघ फक्त व्यायाम आणि चर्चा करून योजना आखणार आहे कि तिसऱ्या कसोटीमध्ये कसे उतरायचे. २२ तारखेपासून खेळाडू सरावाला प्रारंभ करणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news Sunandan Lele writes about Virat Kohli, Ravi Shastri performance