भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; अंतिम फेरीत प्रवेश

वृत्तसंस्था
Tuesday, 30 January 2018

भारताची अंतिम फेरीत लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारताने या स्पर्धेत साखळी फेरीत यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेला आहे. त्यामुळे यंदाच्या विश्वकरंडकाचा प्रमुख दावेदार म्हणून भारतीय संघाकडे पाहिले जात आहे.

ख्राईस्टचर्च - शुभम गिलचे शतक आणि गोलंदाजांच्या बहारदार कामगिरीच्या जोरावर भारताने 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 203 धावांनी विजय मिळविला. या विजयाबरोबरच भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला असून, भारताची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

उपांत्य फेरीच्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 272 धावा केल्या होत्या. या धावसंख्येसमोर पाकिस्तानचा डाव अवघ्या 69 धावांत संपुष्टात आला. राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शुभम गिलची 94 चेंडूत 102 धावांची केलेली नाबाद खेळी हेच भारताच्या विजयाचे कारण ठरले. भारताचा कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनज्योत कालरा या सलामीवीरांनी चांगली सुरवात करून दिल्यानंतर शुभम गिलने झळकाविलेल्या शतकामुळे भारत 272 धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला.

या आव्हानापुढे पाकिस्तानचे फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकले नाहीत. ईशान पोरेलच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकली. ईशानने 4 बळी मिळविले. त्याला शिवा सिंग आणि रियान पराग यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत चांगली साथ दिली. पाकिस्तानचे अवघे तीन फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले.

भारताची अंतिम फेरीत लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारताने या स्पर्धेत साखळी फेरीत यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेला आहे. त्यामुळे यंदाच्या विश्वकरंडकाचा प्रमुख दावेदार म्हणून भारतीय संघाकडे पाहिले जात आहे.

ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news U19 World Cup India best Pakistan by 203 runs face Australia in final