वेगवान चेंडूची भीती हा मनाचा खेळ : कोहली 

शनिवार, 13 जानेवारी 2018

आम्ही कदाचित सलामीची जोडी बदलू. बरेच लोक एकदम अजिंक्‍य रहाणेबद्दल बोलू लागले आहेत. मान्य आहे की अजिंक्‍य दर्जेदार फलंदाज आहे आणि त्याची परदेशातील कामगिरी सर्वात चांगली आहे. आत्ताच्या घडीला त्याचा फॉर्म थोडा खराब होता आणि रोहितचा फारच जबरदस्त होता म्हणून अजिंक्‍य रहाणेच्या पुढे रोहितला पसंती आम्हाला द्यावी लागली.

सेंच्युरियन : "वेगवान गोलंदाजीला सामोरे जाताना चेंडूचा वेग त्रास देत नाही जेव्हा तुम्ही मनातून 100% तयार असता. जेव्हा तुमचा सराव उत्तम झालेला असतो तंदुरुस्ती पूर्ण असते आणि तुम्ही सामान्याकरता मनातून सज्ज असता तेव्हा कोणी कितीही वेगाने चेंडू टाकला तरी त्याचा वेग भयावह वाटत नाही. मला सगळा मनाचा खेळ वाटतो,'' असे मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. 
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कोहली म्हणाला, "कसोटी सामना पाच दिवसांचा असतो. चांगला खेळाडू आणि संघ प्रत्येक तास प्रत्येक सत्र तन्मयतेने खेळून त्यातील छोट्या लढाया जिंकण्याचा प्रयत्न करतो. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर यश मिळवायचे झाल्यास नेमके तेच करावे लागेल. पहिल्या कसोटीत गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय होती. आता गोलंदाजांना साथ देण्याची जबाबदारी आम्हा फलंदाजांची आहे.'' 

संघाच्या बांधणीबद्दल विराटने सलामीच्या जोडीत बदल होण्याचे संकेत दिले. तो म्हणाला, "आम्ही कदाचित सलामीची जोडी बदलू. बरेच लोक एकदम अजिंक्‍य रहाणेबद्दल बोलू लागले आहेत. मान्य आहे की अजिंक्‍य दर्जेदार फलंदाज आहे आणि त्याची परदेशातील कामगिरी सर्वात चांगली आहे. आत्ताच्या घडीला त्याचा फॉर्म थोडा खराब होता आणि रोहितचा फारच जबरदस्त होता म्हणून अजिंक्‍य रहाणेच्या पुढे रोहितला पसंती आम्हाला द्यावी लागली.'' 

भारतीय संघ टक्कर देईल : फाफ डु प्लेसीस 
प्रतिस्पर्धी कर्णधार फाफ डु प्लेसिस याने पहिल्या कसोटीत भारतीय संघावर वर्चस्व राखल्यानंतरही त्यांना कमी लेखणे योग्य नसल्याचे सांगितले. तो म्हणाला, ""पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाने भारतीय संघ खचेल असे अजिबात वाटत नाही. जबरदस्त कामगिरी करून पुनगरामन करण्याची क्षमता भारतीय संघात निश्‍चित आहे.'' 

सेंच्युरियनच्या खेळपट्टीबाबत समाधान व्यक्त करताना डू फ्लेसिसने वेगवान गोलदाजांना साथ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. तो म्हणाला, ""सेंच्युरियनच्या विकेटवर चेंडू उसळतो हा इतिहास आहे. पण, तीन दिवसांनंतर तो खालीसुद्धा राहू शकतो. आम्ही पहिल्या सामन्याप्रमाणे चार वेगवान गोलंदाज घेऊनच खेळू.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news Virat Kohli statement on second test against South Africa