कसोटी क्रिकेट खेळायचे ध्येय हवे: विराट कोहली 

Monday, 12 February 2018

2006 साली भारतीय 19 वर्षां खालच्या संघाने विश्‍व चषक जिंकून कमाल केली होती. त्या संघाचा कप्तान होता विराट कोहली. विराटला भारतीय युवा संघाच्या यशाचे खूप कौतुक आहे हे त्याच्याशी बोलल्यावर समजले. "सकाळ'शी बोलताना विराट म्हणाला, "आमचे बारीक लक्ष होतेच युवा संघावर. मला तर काही वेळा माझ्या वर्ल्डकप मोहिमेच्या आठवणी येत होत्या. पृथ्वी शॉच्या सहकाऱ्यांनी खरच दर्जेदार आणि सपशेल वरचढ कामगिरी करून दाखवली ज्याचा आम्हांला खूप अभिमान वाटतो'', विराट बोलू लागला. 

पोर्ट एलिझाबेथ : पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय 19 वर्षांखालील संघाने विश्‍वकरंडक जिंकून कमाल केली. समोर आलेल्या प्रत्येक संघाला मोठ्या फरकाने पराभूत करत युवा संघाने भारतीय संघाची ताकद दाखवली. विश्‍व विजेतेपदानंतर प्रशिक्षक राहुल द्रविडने सांगितले की , "ही फक्त सुरुवात आहे या युवा खेळाडूंकरता. मला आशा आहे की हे युवा खेळाडू विश्‍व विजेतेपदाच्या यशाचा आनंद घेतील पण समाधानी राहणार नाहीत. त्यांना अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. मुख्य भारतीय संघातून खेळत सर्वोत्तम कामगिरी करून दाखवण्याची जिद्द पृथ्वी शॉ आणि त्याच्या सहकाऱ्यांना दाखवावी लागेल', राहुल द्रविड म्हणाला. 

2006 साली भारतीय 19 वर्षां खालच्या संघाने विश्‍व चषक जिंकून कमाल केली होती. त्या संघाचा कप्तान होता विराट कोहली. विराटला भारतीय युवा संघाच्या यशाचे खूप कौतुक आहे हे त्याच्याशी बोलल्यावर समजले. "सकाळ'शी बोलताना विराट म्हणाला, "आमचे बारीक लक्ष होतेच युवा संघावर. मला तर काही वेळा माझ्या वर्ल्डकप मोहिमेच्या आठवणी येत होत्या. पृथ्वी शॉच्या सहकाऱ्यांनी खरच दर्जेदार आणि सपशेल वरचढ कामगिरी करून दाखवली ज्याचा आम्हांला खूप अभिमान वाटतो'', विराट बोलू लागला. 

भारताने 4 वेळा 19 वर्षां खालचा विश्‍व चषक जिंकला असला तरी विजयी संघातील त्या मानाने फार खेळाडूंनी मुख्य भारतीय संघात जागा पटकावून कमाल कामगिरी करून दाखवली आहे हा मुद्दा मांडला असता विराट कोहली म्हणाला, "काही प्रमाणात बरोबर आहे हा मुद्दा. युवा खेळाडूंनी लक्षात घेतले पाहिजे की शाळेतून कॉलेज मधे जाण्यासारखा हा अनोखा प्रवास आहे. पातळी एकदम बदलते. त्या करता मेहनतीला पर्याय नाही. तसेच या प्रवासात घाई करून चालत नाही. मला कल्पना आहे की 19 वर्षां खालचे काही खेळाडू इतके चांगले आहेत की देव जाणे कदाचित आपल्या अपेक्षांपेक्षा काही खेळाडू लवकर येतील मुख्य भारतीय संघात'', खांदे उडवत हसत हसत विराट म्हणाला. 

काय करायला पाहिजे युवा खेळाडूंनी पुढची पातळी गाठायला, असे विचारल्यावर विराट म्हणाला, "मला वाटते टप्प्या टप्प्याने प्रगती झाली तरच ती मस्त टिकते. मी जेव्हा भारतीय 19 वर्षां खालचा विश्‍व चषक जिंकून आलो तेव्हा मला दिल्लीकडून एकदम चांगल्या प्रकारे रणजी स्पर्धा खेळून गाजवायची होती. मग मला भारतीय "अ' संघात जागा पटकवायची होती. भारतीय "अ' संघाच्या परदेश दौऱ्यात समोरच्या चांगल्या तरुण खेळाडूंसमोर चांगली फलंदाजी करून दाखवायची होती. जर मला हे सातत्याने करता आले तरच निवड समिती माझ्याकडे मान वळवून बघेल हे मला माहीत होते. युवा खेळाडूंना मी इतकेच सांगेन की हा मुख्य संघात प्रवेश करायचा राज मार्ग आहे'', विराट मनापासून बोलत होता. 

सर्वात शेवटी महत्त्वाचा मुद्दा मांडताना विराट म्हणाला, "सर्वात मोलाचा सल्ला हाच देईन मी की युवा खेळाडूंनी कसोटी क्रिकेट खेळायचे ध्येय ठेवायला हवे. जर प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधे सर्वोत्तम कामगिरी करून कसोटी संघात तुम्ही प्रवेश करू शकलात आणि चांगला खेळ करून संघातील जागा पक्की करू शकलात तर बाकीचे क्रिकेटचे फॉर्मेट अंगीकारायला कठीण जाणार नाही. कसोटी क्रिकेट हीच खरी सत्त्वपरीक्षा आहे हे युवा खेळाडूंनी समजून घ्यायलाच पाहिजे'', विराट म्हणाला. 

4 वेळा भारतीय संघ 19 वर्षां खाचा विश्‍व चषक जिंकला असला तरी विराट कोहली, युवराज सिंग, मोहंमद कैफ आणि हरभजन सिंग सारख्या खूप कमी खेळाडूंनी 19 वर्षां खालच्या संघातून विश्‍व चषक जिंकून नंतर मुख्य संघात प्रवेश मिळवून तिथेही दर्जेदार खेळ करून दाखवला आहे. पृथ्वी शॉ आणि त्याच्या सहकाऱ्यांना विराट कोहलीचा कानमंत्र मनात कोरणे फार गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news Virat Kohli statement on U19 world cup winner