बीसीसीआयने चेंडू टाकला सरकारच्या कोर्टात पाकबरोबर द्विपक्षीय क्रिकेट मालिका 

वृत्तसंस्था
Tuesday, 29 May 2018

पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याबाबत आपल्या देशाची भूमिका कळवा, अशी अधिकृत विचारणा अखेर बीसीसीआयने केंद्र सरकारकडे केली आहे. पाकिस्तानबरोबर 2012 पासून भारताची द्विपक्षीय मालिका झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर पाक मंडळाकडून वारंवार तगादा लावण्यात येत आहे; त्यामुळे बीसीसीआयने सरकारच्या कोर्टात हा चेंडू टाकला आहे. 

 

नवी दिल्ली - पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळण्याबाबत आपल्या देशाची भूमिका कळवा, अशी अधिकृत विचारणा अखेर बीसीसीआयने केंद्र सरकारकडे केली आहे. पाकिस्तानबरोबर 2012 पासून भारताची द्विपक्षीय मालिका झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर पाक मंडळाकडून वारंवार तगादा लावण्यात येत आहे; त्यामुळे बीसीसीआयने सरकारच्या कोर्टात हा चेंडू टाकला आहे. 

जोपर्यंत केंद्र सरकार आम्हाला हिरवा कंदील दाखवत नाही, तोपर्यंत आम्ही पाकबरोबरच्या कोणत्याही द्विपक्षीय मालिकेत खेळणार नाही, असे बीसीसीआयकडून प्रत्येक वेळी सांगण्यात आलेले आहे. 

भारत-पाक द्विपक्षीय मालिका खेळण्याचा 2014 मध्ये करार करण्यात आला होता. बीसीसीआयने हा करार धुडकावून खेळण्यास नकार दिल्यामुळे पाक मंडळाने भारतावर 7 कोटी डॉलरची नुकसानभरपाई मागितली आहे. या पार्श्‍वभूमीवर आयसीसीची वादनिवारण समिती चर्चा करणार आहे. त्यासाठी बीसीसीआयची भूमिका स्पष्ट होण्यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे अधिकृपणे विचारणा केली आहे. 

बीसीसीआयकडून केंद्र सरकारकडे झालेला हा रुटीन संपर्क आहे; तसेच कोणत्याही मालिकेसाठी सरकारची परवानगी घेणे हे आमचे कर्तव्य आहे आणि सरकारच्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत. आम्हाला अधिकृत माहिती मिळाल्यावर आम्ही ती वादविवाद निवारण समितीला कळवू, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. 

बीसीसीआयकडून आम्हाला कोणताच प्रतिसाद मिळत नाही. एकमेकांच्या देशात खेळात येत नसेल, तर त्रयस्थ देशात तरी मालिका खेळण्यास बीसीसीआय का नकार देते, अशी तक्रार पाक मंडळाकडून वादविवाद निवारण समितीकडे करण्यात आलेली आहे. 

भारत-पाक मंडळातील वादविवाद निवारण समितीची बैठक मिशेल ब्लेऑफ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यामुळे बीसीसीआयची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही घडामोड घडली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket series with Pakistan