'श्रीरामा'च्या आशीर्वादाने ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

स्टीव ओकीफ पहिल्या कसोटीत यशस्वी ठरला, कारण त्याने पूर्वतयारी चांगली केली होती, तसेच त्याने प्रयोग करण्याची इच्छा दाखविली, असे ऑस्ट्रेलियन संघाचे फिरकी सल्लागार श्रीधरन श्रीराम यांनी सांगितले.

पुणे - भारतीय संघाकडून 1990च्या दशकात 'ते' केवळ 8 एकदिवसीय सामने खेळले. नंतर काही रणजी सामन्यांनंतर ते पडद्याआड गेले. मात्र आता हा माजी खेळाडू अचानकपणे चर्चेत आला आहे... त्याचं कारण म्हणजे पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने मिळवलेल्या दणदणीत विजयात त्यांचा सिंहाचा वाटा आहे! ते म्हणजे ऑस्ट्रेलियन संघाचे फिरकी सल्लागार श्रीधरन श्रीराम.

केवळ 70 धावांत 12 भारतीय फलंदाजांना तंबूत पाठविणारा फिरकीपटू स्टीफन ओकीफ याला श्रीधरन यांनी मार्गदर्शन केले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खास भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे फिरकी सल्‍लागार म्हणून श्रीधरन यांची निवड केली आहे. 

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताला गारद केले. यात डावखुरा फिरकी गोलंदाज स्टीव ओकीफ याच्या १२ विकेट निर्णायक ठरल्या. त्याच्या यशाचे पडद्यामागील सूत्रधार श्रीराम असल्याचे मानले जाते.

श्रीराम यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ओकीफने नेमका काय बदल केला, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘बदलच केला असे म्हणण्यापेक्षा त्याने परिस्थितीशी जुळवून घेतले. भारत हा इतका मोठा देश आहे की, येथे एक उपाय लागू होत नाही. एखादी गोष्ट चालेल असे तुम्हाला वाटले तर तसे होत नाही. त्यामुळे विशिष्ट दिवशी तुमच्यासाठी काय अनुकूल ठरते, याचा अंदाज घेत परिस्थितीशी लगेच जुळवून घ्यावे लागते. याच बाबतीत ओकीफ सरस ठरला, कारण त्याने तयारी चांगली केली होती. नेटमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयोग करून पाहण्याची त्याची तयारी होती. २०१५ मध्ये चेन्नई आम्ही एकत्र सराव केला होता. कसोटीतील प्रत्येक दिवसाचा रोज खुल्या दिलाने सामना करावा लागतो, कारण एक दिवस चाललेली गोष्ट दुसऱ्या दिवशी चालत नाही याची त्याला कल्पना होती. हेच त्याचे बलस्थान होते.’’

नावात काय आहे?
श्रीराम केवळ आठ वन-डे खेळले. खेळाडू म्हणून त्यांचे नाव फार मोठे नाही. यामुळे प्रशिक्षक म्हणून मान्यता मिळविण्यास अडचणी आल्या का, या प्रश्नावर त्यांनी निर्धाराने सांगितले की, नावामुळे फरक पडतो का, तर मला नाही तसे वाटत. कारण प्रशिक्षकाचे नाव नव्हे तर त्याने दिलेली माहिती महत्त्वाची असते. त्यावरून त्यास खेळाडूंचा आदर मिळतो की नाही, हे अवलंबून असते. जर मी आलो आणि ज्यात तथ्य आहे अशा गोष्टी बोललो तर ते ऐकतील, मग वायफळ बडबड केली तर ते दुर्लक्ष करतील, हे गणित इतके सोपे आहे. हे घडायला थोडा वेळ लागतो.

लिमनकडून स्वातंत्र्य
मुख्य प्रशिक्षक डॅरेन लिमन यांच्याकडून स्वातंत्र्य मिळाल्याचे श्रीराम यांनी आवर्जून सांगितले. ते म्हणाले, ‘‘केवळ फिरकी गोलंदाजच नव्हे तर मी प्रत्येकाशी बोलतो. लिमन यांनी दिलेले हे स्वातंत्र्य आश्‍चर्यकारक आहे. खेळाडूंनी काय करावे, याविषयी मी काही सूचना करतो. खेळात त्याचा अवलंब करायचा की नाही हे त्यांच्यावर अवलंबून आहे.’’

पुण्याची खेळपट्टी भारतीय संघाला नव्हे तर ओकीफला फायदेशीर ठरली. याचे पूर्ण श्रेय श्रीराम यांनी ओकीफला दिले. ते म्हणाले, ‘‘भारत हा आव्हानात्मक संघ आहे. भारतीय खेळाडूंना रोखणे सोपे नाही. खरे तर प्रत्यक्ष कसोटीच्या दिवशी तुम्ही कसा खेळ करता यावर सारे काही अवलंबून असते.’’

श्रीराम यांनी सांगितले, की फिरकी गोलंदाजीचा सल्लागार म्हणून स्थिरावण्यास मला थोडा वेळ लागला, पण ऑस्ट्रेलियन्स अगदी खुल्या मनाने ऐकून घेतात. ही त्यांची फार चांगली गोष्ट आहे. ते आधी ऐकून घेतात. अर्थातच मी थोडे शहाणपणाचे बोललो असेन. त्यामुळे त्यांनी नेटमध्ये प्रयोग करून पाहण्यास सुरवात केली. त्याचा उपयोग होत असल्याचे त्यांना दिसून आले असावे. अशा प्रकारे मी स्थिरावलो.

Web Title: cricket : Sriram's familiarity with India gives Australia edge