क्रिकेटमध्ये शिस्तभंगाविरुद्ध कडक नियम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

लंडन - मेरीलीबोन क्रिकेट क्‍लबच्या क्रिकेट समितीने मैदानावरील बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी कडक नियम केले आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये मुंबईत झालेल्या बैठकीत ठरलेले नियम एक ऑक्‍टोबरपासून लागू होतील.

लंडन - मेरीलीबोन क्रिकेट क्‍लबच्या क्रिकेट समितीने मैदानावरील बेशिस्तीला लगाम घालण्यासाठी कडक नियम केले आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये मुंबईत झालेल्या बैठकीत ठरलेले नियम एक ऑक्‍टोबरपासून लागू होतील.

"आयसीसी'ने त्यासाठी पावले उचलली आहेत. सततचे दडपण आणि खेळाडूंच्या शिस्तभंगामुळे अनेक ज्युनियर पंचांनी पंचगिरी करणे सोडून दिले आहे. आता मात्र पंचांना नव्या नियमांमुळे कारवाईचे अधिकार मिळाले आहेत. एमसीसीचे क्रिकेट विभागाचे प्रमुख जॉन स्टीफन्सन यांनी सांगितले, की खेळाडूंच्या वाईट वर्तनाला लगाम घालण्याची वेळ आली आहे. ज्युनिअर लेव्हलला अनेक पंचांवर बाहेर पडण्याची वेळ आल्याचे आम्हाला आढळून आले. या नियमांमुळे शिस्तपालनाचा मुद्दा परिणामकारक पद्धतीने हाताळला जाईल, अशी आशा आहे.

शिस्तभंगाची तीव्रता
पातळी 1 - वारंवार अपील करणे, पंचांच्या निर्णयाविरुद्ध हुज्जत घालणे. अधिकृत ताकीद दिल्यानंतर असा शिस्तभंग केल्यास पाच धावांचा दंड आणि त्या धावा प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यात जमा

पातळी 2 - एखाद्या खेळाडूवर चेंडू फेकणे, खेळादरम्यान प्रतिस्पर्धी खेळाडूला मुद्दाम धक्का देणे. हे घडताच प्रतिस्पर्धी संघाला पाच धावा.

पातळी 3 - पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, खेळाडू, संघाचा पदाधिकारी किंवा प्रेक्षकावर हल्ल्याचा इशारा दिल्यास पाच धावांचा दंड. याशिवाय संबंधित खेळाडूला सामन्याच्या स्वरूपानुसार काही षटके मैदानाबाहेर काढले जाईल

पातळी 4 - पंचांना धमकी देणे किंवा खेळादरम्यान कोणतेही हिंसक कृत्य केल्यास पाच धावांचा दंड, तसेच खेळाडूला उर्वरित सामन्यातून बाहेर काढणे. खेळाडू तेव्हा फलंदाजी करीत असल्यास तो किंवा ती निवृत्त बाद (रिटायर्ड आउट) अशी नोंद.

Web Title: cricket srtict rules for discipline