हा 'वर्ल्ड कप' आता भारताचाच - कपिलदेव

पीटीआय
Thursday, 9 May 2019

तुलना करू नका
हार्दिक पंड्याची तुलना तुमच्याशी केली जाते, यावर कपिलदेव नम्रपणे म्हणाले, की त्याच्यावर दडपण टाकू नका. त्याला त्याचा नैसर्गिक खेळ करू द्या. त्याच्याकडे अफाट नैसर्गिक गुणवत्ता आहे. कोणाचीही कोणाशी तुलना केली जाणे मला आवडत नाही. असे करताना आपण विनाकारण त्या खेळाडूवर दडपण टाकत असतो.

नवी दिल्ली - नवोदित आणि अनुभवी खेळाडूंचा संगम आणि त्याला अद्वितीय धोनीची मिळणारी साथ असा योग साधून येणार असल्यामुळे विराटचा संघ विश्‍वकरंडक उंचावू शकेल, असा विश्‍वास पहिले विश्‍वविजेते कर्णधार कपिलदेव यांनी व्यक्त केला.

या मोहिमेसाठी विराट, रोहित शर्मा, महंमद शमी, शिखर धवन असे अनुभवी खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादवसारखे खेळाडू प्रथमच विश्‍वकरंडक खेळणार आहेत आणि यांना धोनीच्या अनुभवाची साथ मिळणार आहे. या खेळाडूंची क्षमता लक्षात घेता इतर संघांच्या तुलनेत आपला संघ अनुभवी आहे. चार वेगवान आणि तीन फिरकी 
गोलंदाज असा चांगलाच समतोलही आहे. विराट- धोनी ही अलौकीक जोडी संघाची ताकद वाढवणारी आहे, असे कपिलदेव यांनी म्हटले आहे.

वेगवान माऱ्याचे कौतूक
त्यांनी वेगवान माऱ्याचेही कौतुक केले. इंग्लंडमधील वातावरणात चार (बुमरा, शमी, भुवनेश्‍वर आणि हार्दिक) वेगवान गोलंदाज ताकदवर ठरू शकतील. हवामान त्यांना स्विंगसाठी सहायक ठरू शकेल. शमी आणि बुमरा ताशी १४५ किमी वेगाने चेंडू टाकतात, असा वेगवान माऱ्याला स्विंगची साथ मिळाली, तर आपण कोणत्याही संघावर वर्चस्व मिळवू शकतो, असे कपिलदेव म्हणाले.

चौथ्या क्रमांकावर कोण?
आयपीएलवरून चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार, हे सांगणे अवघड आहे. इंग्लंडला गेल्यानंतर खेळाडूंची मानसिकता पाहूनच निर्णय घेतला जाईल, असे कपिल यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cricket Worldcup India Kapil Dev