...हा क्रिकेटर घेणार ८५ व्या वर्षी निवृत्ती

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

वेस्टइंडिजच्या सेसिल राईट या जलदगती गोलंदाजाने वयाला आपल्या काबूत ठेवत ८५ व्या वर्षी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. राईटने आपण निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

नवी दिल्ली : सर्वसाधारणपणे एखादा क्रिकेटर वयाच्या पस्तिशी ते चाळीशीपर्यंत निवृत्ती घेतो. यात जलदगती गोलंदाजांच्या करिअरचा कालावधी तर आणखीनच कमी असतो. मात्र, वेस्टइंडिजच्या सेसिल राईट या जलदगती गोलंदाजाने वयाला आपल्या काबूत ठेवत ८५ व्या वर्षी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. राईटने आपण निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

राईट हे गैरी सोबर्स आणि वेल हास यांसारख्या नामांकित खेळाडूंसोबत जमैकासाठी एक आंतरराष्ट्रीय सामना खेळले आहेत. बार्बाडोस विरुद्ध हा सामना १९५८ मध्ये खेळला गेला होता. त्यानंतर १९५९ मध्ये राईट हे इंग्लंडला गेले. या ठिकाणी त्यांनी सेंट्रल लंकाशर लीगमध्ये क्रोमप्टॉनकडून खेळत आपल्या करिअरला सुरुवात केली. राईट हे विवियन रिचर्ड्स आणि जोएल गार्नर यांसारख्या दिग्गज खेळाडूंसोबतही क्रिकेट खेळले आहेत.

७ हजाराहून अधिक विकेट्स
रिचर्ड यांनी आपल्या ६० वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये ७ हजाराहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय राईट यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी अंदाजित २० लाखांहून अधिक सामने खेळले आहेत. राईट यांनी आपल्या या फिटनेसचे श्रेय लंकाशरच्या पारंपरिक आहाराला दिले आहे.

उद्या खेळणार शेवटचा सामना
राईट आपल्या करिअरचा शेवटचा सामना उद्या (७ सप्टेंबर) खेळणार आहे. या सामन्यात ते पेन्निने लीगमध्ये अपरमिलसाठी स्प्रिंगहेड विरुद्ध मैदानात उतरतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... this cricketer will retire at the age of 85