तिने विराटला लग्नाची मागणी घातली.. त्याने तिला भेट दिली..!

वृत्तसंस्था
Tuesday, 13 March 2018

लंडन : इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलंदाज डॅनी वॅटची भारतीय क्रिकेटरसिकांना ओळख विराट कोहलीमुळे आहे.. विराटला ट्‌विटरवरून लग्नाची मागणी घालणारी डॅनी वॅट आता पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे.. आणि यावेळी तिच्याकडे असेल विराट कोहलीने भेट म्हणून दिलेली खास बॅट! 

लंडन : इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलंदाज डॅनी वॅटची भारतीय क्रिकेटरसिकांना ओळख विराट कोहलीमुळे आहे.. विराटला ट्‌विटरवरून लग्नाची मागणी घालणारी डॅनी वॅट आता पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे.. आणि यावेळी तिच्याकडे असेल विराट कोहलीने भेट म्हणून दिलेली खास बॅट! 

भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या महिला संघांमध्ये या महिन्यात तिरंगी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेपासून डॅनी वॅट विराटने दिलेली बॅट वापरण्यास सुरवात करत आहे. इंग्लंडसाठी वॅटने गेल्या नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्‌वेंटी-20 सामन्यात शतक झळकाविले होते. इंग्लंडच्या महिला संघाकडून ट्‌वेंटी-20 मध्ये शतक झळकाविणारी डॅनी ही पहिली खेळाडू आहे. 

2014 मध्ये झालेल्या ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट कोहलीने 72 धावा केल्या होत्या. या खेळीचं कौतुक करताना डॅनी वॅटने ट्विटरवर चक्क त्याला लग्नाची मागणीच घातली. 'त्या ट्विटनंतर दहा मिनिटांनी मी माझा फोन पुन्हा हातात घेतला.. तेव्हा हजारो रिट्विट्‌स, फेव्हरेट्‌स आले होते.. भारतीय प्रसिद्धीमाध्यमांमध्ये याचीच चर्चा सुरू झाली होती', असे वॅटने 'क्रिकइन्फो'शी बोलताना सांगितले. 

या घटनेनंतर त्याच वर्षी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना विराट आणि डॅनीची भेट झाली. त्यावेळी विराट तिला म्हणाला, 'ट्‌विटरवर असं काही करत जाऊ नकोस. लोक अशा गोष्टी खूप गांभीर्याने घेतात..!' 'त्यावर मी त्याला सॉरी म्हटलं', असे डॅनीने सांगितले. यानंतर विराटने डॅनीला त्याची एक बॅट भेट म्हणून दिली. 

'नोव्हेंबरमध्ये शतक झळकाविताना वापरलेली बॅट काही दिवसांपूर्वीच तुटली. त्यामुळे आता यापुढे मी विराटने दिलेली बॅट वापरणार आहे', असे डॅनीने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Danielle Wyatt Virat Kohli tweet England Womens Team