पर्थवर इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

वृत्तसंस्था
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

संक्षिप्त धावफलक :
दक्षिण आफ्रिका : पहिला डाव : सर्वबाद 242
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : सर्वबाद 244
दक्षिण आफ्रिका : दुसरा डाव : 126 धावांत 6 बाद 390
स्टीफन कूक 12, डीन एल्गर 127, हाशिम आमला 1, जेपी ड्युमिनी 141, फाफ डू प्लेसिस 32, टेम्बा बावुमा 8, क्विंटन डिकॉक खेळत आहे 16, व्हरनॉन फिलॅंडर खेळत आहे 23
अवांतर : 30
गोलंदाजी : मिचेल स्टार्क 1-99, जोश हेझलवूड 2-97, पीटर सिडल 2-47, मिशेल मार्श 1-52, नॅथन लिऑन 0-76, ऍडम व्होजेस 0-2.

पर्थ: पर्थच्या ऐतिहासिक 'वॅका' मैदानावर इतिहासाची पुनरावृत्ती होईल, असे चित्र आज (शनिवार) दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी निर्माण केले.

सामन्याच्या पहिल्या दिवशी पूर्ण वर्चस्व राखलेल्या ऑस्ट्रेलियाला नंतरच्या दोन दिवसांत दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या धक्‍क्‍यांमुळे आता ऑस्ट्रेलिया 'बॅकफूट'वर गेली आहे. सलामीवीर डीन एल्गर आणि अनुभवी जेपी ड्युमिनी यांनी मनसोक्त फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजविले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात सहा गडी गमावून 390 धावा केल्या होत्या आणि आता त्यांच्याकडे एकूण 388 धावांची आघाडी आहे. एल्गर आणि ड्युमिनी या दोघांनीही शतक झळकाविले. 'वॅका'च्या मैदानावरील कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळविता आलेला नाही. तसेच, येथे चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाने इतक्‍या मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलागही केलेला नाही. त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता आहे. कसोटीमध्ये चौथ्या डावात 400 हून अधिक लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केवळ चार वेळाच झाला आहे. मात्र, डेल स्टेनची दुखापत हा दक्षिण आफ्रिकेच्या विजयातील मोठा अडथळा असेल.

पर्थमधील उष्ण वातावरणामध्ये एल्गर-ड्युमिनी जोडीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना पुरते दमविले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 250 धावांची भागीदारी केली. दोघांनीही ऑस्ट्रेलियाला कुठलीही संधी दिली नाही. पीटर सिडलने अखेर ड्युमिनीला 141 धावांवर बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर तुलनेने झटपट मिळालेल्या विकेट्‌स आणि डेल स्टेनची दुखापत या दोनच गोष्टी ऑस्ट्रेलियासाठी दिलासादायक ठरल्या.

चहापानानंतर एल्गर लगेचच बाद झाला. कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि टेम्बा बावुमाही फार काळ टिकले नाहीत. त्यानंतर क्विंटन डिकॉक आणि व्हरनॉन फिलॅंडर यांनी दिवसातील उरलेल्या दहा षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. संघासाठी अत्यावश्‍यक असेल, तरच डेल स्टेन फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या हातात अद्याप तीन विकेट्‌स आहेत.

Web Title: Dean Elgar, JP Duminy tons put Australia on Backfoot in Perth Test