क्रिकेट: झगडणाऱ्या दिल्लीला आता मार्लन सॅम्युअल्सचा आधार

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

सॅम्युअल्स यापूर्वी 2013 मध्ये 'आयपीएल'मध्ये खेळला होता. त्यावेळी तो तत्कालीन पुणे वॉरिअर्स संघात होता. 2012 मध्ये त्याने पुण्याच्या संघाकडून आठ सामने खेळले. यात त्याने 124 धावा आणि आठ गडी बाद केले होते.

नवी दिल्ली : यंदाच्या 'आयपीएल'मध्ये ढिसाळ फलंदाजीमुळे अडचणीत आलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सने वेस्ट इंडीजच्या मार्लन सॅम्युअल्सला करारबद्ध केले आहे. दिल्लीकडून खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज क्विंटन डीकॉक यंदा दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्या जागी सॅम्युअल्सला संघात स्थान दिले जाणार आहे. 29 एप्रिलला होणाऱ्या दिल्लीच्या सामन्यापासून तो संघात दाखल होऊ शकेल. 

यंदाच्या मोसमामध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सची गोलंदाजी आणि झहीर खानचे कल्पक नेतृत्व यांचे कौतुक होत आहे. पण अनुभव नसलेल्या फलंदाजांमुळे दिल्लीला लक्षणीय यश मिळालेले नाही. या संघाची मदार संजू सॅमसन, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, करुण नायर, आदित्य तरे या नवोदितांवरच आहे. तळात फलंदाजीस येणारा ख्रिस मॉरिस सातत्यपूर्ण फलंदाजी करत असला, तरीही त्याला आवश्‍यक ती साथ इतर फलंदाजांकडून मिळालेली नाही. जेपी ड्युमिनी, क्विंटन डीकॉक हे अनुभवी फलंदाज दुखापतीमुळे यंदाच्या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीच्या संघाला मार्लन सॅम्युअल्सच्या फलंदाजीचा आधार घ्यावा लागला. 

सॅम्युअल्स यापूर्वी 2013 मध्ये 'आयपीएल'मध्ये खेळला होता. त्यावेळी तो तत्कालीन पुणे वॉरिअर्स संघात होता. 2012 मध्ये त्याने पुण्याच्या संघाकडून आठ सामने खेळले. यात त्याने 124 धावा आणि आठ गडी बाद केले होते. अर्थात ट्‌वेंटी-20 मधील त्याची एकूण कामगिरी प्रभावी आहे. आतापर्यंत खेळलेल्या 149 ट्‌वेंटी-20 सामन्यांत सॅम्युअल्सने 32.66 च्या सरासरीने 3757 धावा केल्या आहेत. यात त्याचा स्ट्राईक रेट 117.51 इतका आहे. तसेच, 7.01 च्या सरासरीने धावा देत त्याने 68 गडीही बाद केले आहेत. 

दिल्ली डेअरडेव्हिल्सला आतापर्यंतच्या सहा सामन्यांमध्ये दोनच विजय मिळविता आले आहेत. उद्या (शुक्रवार) त्यांची लढत ताकदवान कोलकाता नाईट रायडर्सशी होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi Daredevils rope in Marlon Samuels for Quinton de Kock