धोनीने नागपुरातच घेतला कर्णधारपद सोडण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

नागपूर - महेंद्रसिंह धोनीने बुधवारी अचानक भारतीय ‘वनडे’ व ‘टी-२०’ संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेऊन क्रिकेटप्रेमींना आश्‍चर्याचा धक्‍का दिला. धोनीने हा निर्णय नागपूर भेटीतच घेतल्याची माहिती आहे. 

नागपूर - महेंद्रसिंह धोनीने बुधवारी अचानक भारतीय ‘वनडे’ व ‘टी-२०’ संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेऊन क्रिकेटप्रेमींना आश्‍चर्याचा धक्‍का दिला. धोनीने हा निर्णय नागपूर भेटीतच घेतल्याची माहिती आहे. 
झारखंड संघाचा ‘मेंटॉर’ असलेला धोनी गेल्या चार दिवसांपासून नागपुरात आहे. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर संपलेल्या रणजी  करंडक उपांत्य सामन्यासाठी गेल्या एक जानेवारीलाच धोनी नागपुरात आला होता. धोनीपाठोपाठ राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद आणि समितीचे सदस्य जतीन परांजपे हेही नागपुरात दाखल झाले होते. सामन्यादरम्यान धोनी व प्रसाद अनेकवेळा चर्चा करताना दिसले. बुधवारी सामना संपल्यानंतरसुद्धा दोघेही बराचवेळपर्यंत मैदानावर चर्चा करीत होते. त्यावेळीच धोनीने कर्णधारपद सोडत असल्याचे प्रसाद यांना सांगितले असावे, अशी चर्चा आहे. उल्लेखनीय म्हणजे, इंग्लंडविरुद्ध येत्या १५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या एकदिवसीय मालिकेसाठी उद्या, गुरुवारी मुंबईत भारतीय संघ निवडला जाणार आहे. त्यापूर्वीच धोनीने ‘बाँब’ टाकून विराट कोहलीसह सर्वांनाच बुचकाळ्यात टाकले.  

धोनीच्या या निर्णयामागे विराटकडे तिन्ही फॉर्मेटमध्ये भारतीय संघाची धुरा देण्याचा उद्देश आहे. 

विराटच्या नेतृत्वाखाली कसोटी संघाने ऐतिहासिक कामगिरी केली असून, वनडे व टी-२० तही तो भारतीय संघाला उच्च शिखरावर नेऊ शकतो, असे धोनीला वाटत असावे. याशिवाय कर्णधारपदाचे ‘टेन्शन’ कमी करून केवळ फलंदाजीवरच अधिकाधिक ‘फोकस’ करता यावा, हाही यामागचा उद्देश आहे. 

धोनीने एकूण २८३ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यापैकी १९९ सामन्यांमध्ये त्याने कर्णधारपद भुषविले. याशिवाय तो ७३ टी-२० सामने खेळला. त्यातील तब्बल ७२ सामन्यांमध्ये त्याने नेतृत्व केले.

असाही योगायोग
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी धोनीने एप्रिल २००५ मध्ये अजनी मैदानावर झालेल्या आंतररेल्वे क्रिकेट स्पर्धेत फटकेबाजी करून तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले होते. स्पर्धेतील शानदार कामगिरीनंतरच त्याची भारतीय ‘अ’ संघात निवड झाली होती व त्यानंतर भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडल्या गेले होते. याच नागपूरमध्ये त्याने वनडे व टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घ्यावा, हाही एक योगायोगच म्हणावा लागेल.

Web Title: Dhoni took the decision to leave the team in Nagpur