esakal | पुढील वर्षी किमान सामने वाढतील; माजी कर्णधार डायना एडल्जींना विश्‍वास
sakal

बोलून बातमी शोधा

Diana Edulji express on women IPL matches

"आयपीएल'बाबत परदेशी खेळाडूंमध्ये कमालीची उत्सुकता आहे. पुढील वर्षीही त्यांना खेळायची इच्छा आहे. अर्थात, महिलांची "आयपीएल' घेण्यापूर्वी खोलवर चर्चा अपेक्षित आहे. - डायना एडल्जी 

पुढील वर्षी किमान सामने वाढतील; माजी कर्णधार डायना एडल्जींना विश्‍वास

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली -  यंदाच्या आयपीएलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या माहिलांचा प्रदर्शनीय सामना चाहत्यांची गर्दी खेचण्यात कमी पडला असला, तरी पुढील वर्षी वेगळेपण बघायला मिळेल. महिलांसाठी स्वतंत्र आयपीएल झाले नाही, तरी सामन्यांची संख्या वाढेल, असा विश्‍वास भारताच्या माजी कर्णधार आणि सध्या बीसीसीआयवर असलेल्या प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडल्जी यांनी व्यक्त केला. 

या वेळी आयपीएलमध्ये मुंबईत महिलांचा एक प्रदर्शनीय सामना खेळविण्यात आला. अनेक लोकप्रिय खेळाडू यात खेळल्या. एडल्जी म्हणाल्या, ""माझ्या मते सामना यशस्वी झाला. मैदानावर चाहत्यांची संख्या कमी असली, तरी टी.व्ही.वरून असंख्य चाहत्यांनी या सामन्याचा आनंद घेतला. महिलांच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अशीच परिस्थिती होती.'' 

एडल्जी यांनी या वेळी लगेच "बीसीसीआय' महिलांच्या स्वतंत्र आयपीएलचा विचार करेल ही शक्‍यता फेटाळून लावली. त्या म्हणाल्या, ""हा एक प्रयत्न होता. पहिले पाऊल पडले आहे. लगेच त्याला मूर्त स्वरुप येईल असे नाही. पण, पुढील मोसमात महिलांच्या सामन्यांची संख्या वाढेल याची मला खात्री आहे.'' 

"आयपीएल'बाबत परदेशी खेळाडूंमध्ये कमालीची उत्सुकता आहे. पुढील वर्षीही त्यांना खेळायची इच्छा आहे. अर्थात, महिलांची "आयपीएल' घेण्यापूर्वी खोलवर चर्चा अपेक्षित आहे. - डायना एडल्जी