परदेशी संघांना पाकमध्ये बोलावू नका- अख्तर

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

येथील परिस्थिती पूर्णपणे शांत होत नाही, तोपर्यंत कोणालाही बोलाविण्याचा धोका पत्करु नका. मला आशा आहे, की पाकिस्तानमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जाईल. पण, त्यासाठी काही वेळ जाईल. 

कराची - क्वेट्टा शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने परदेशी संघांना पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी बोलावू नका असा सल्ला पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) दिला आहे.

क्वेट्टा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 62 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 170 हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाकिस्तानमध्ये श्रीलंका संघावर झालेल्या हल्ल्यानंतर एकही परदेशी संघ पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिकेसाठी गेलेला नाही. आता अख्तरनेही याच कारणामुळे परदेशी संघांना निमंत्रण न देण्याचे आवाहन पीसीबीला केले आहे.

अख्तर म्हणाला, की पाकिस्तानमधील सुरक्षेबाबतची स्थिती चांगली नसल्याने परदेशी संघांना बोलावू नका. येथील परिस्थिती पूर्णपणे शांत होत नाही, तोपर्यंत कोणालाही बोलाविण्याचा धोका पत्करु नका. मला आशा आहे, की पाकिस्तानमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जाईल. पण, त्यासाठी काही वेळ जाईल. 

Web Title: Don't invite foreign teams to Pakistan in current situation: Shoaib Akhtar